दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर तालुक्यातील
सीमावर्ती भागातील बेम्बरा तांडा येथील जुगार अड्यावरील वादग्रस्त छापा कार्यवाहीत सहभागी पोलिसांनी रोख रक्कमेत हात ओले केल्याची चर्चा समाजमाध्यम व विविध वर्तमानपत्रातून उघडकीस आल्यावर पोलीस निरीक्षकांनी बदली झालेल्या पोलीस शिपाई विष्णुकांत चामलवाड यांना तात्काळ कार्यमुक्त केले. या एका कर्मचाऱ्यांवर झालेल्या कार्यवाहिमुळे अन्य सहभागी अधिकारी व कर्मचारी जरी धास्तावले असले तरीही अन्य लोकांवर कार्यवाही कधी होणार? हा प्रश्न जनतेला पडला आहे.
बेम्बरा तांडा येथील जुगार अड्यावर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या अनुपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे व सहकाऱ्यांनी दि. १० रोजी पहाटेच्या सुमारास कार्यवाही केली. वास्तविक हा जुगार अड्डा मोठा असला तरीही त्या कार्यवाहीत जप्त रक्कम ही किरकोळ स्वरूपाची दाखवण्यात आली. या कार्यवाहिमुळे पोलिसांच्या आर्थिक कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केला गेला. या कार्यवाहिशी संबधित काही कर्मचाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बोलावून चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या या भूमिकेमुळे जिल्हा पोलीस दलात मरखेल ठाण्याची चर्चा आहे. यातच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी ठाण्यात येताच प्रकरणात जातीने लक्ष घातले आहे. कार्यवाहीत सहभागी असलेल्या विष्णुकांत चामलवाड या पोलीस कर्मचाऱ्यास ताबडतोब पोलीस ठाण्यात कार्यमुक्त केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील पोलीस कर्मचारी विष्णुकांत चामलवाड हे पोलीस ठाण्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावरचे रहिवासी आहेत. पूर्वीच्या ठाणेदारासोबत असलेल्या घनिष्ट संबंधामुळे चामलवाड यांनी बऱ्यापैकी चलती होती. अवैध व्यवसाईक लोकांसोबत चांगले हितसंबंध असल्याची चर्चा या भागात आहे. परिणामी अवैध व्यावसायिक लोकांना बळ मिळत गेले असल्याची भावना होती. मात्र या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत गेली. दरम्यान लोकांच्या तक्रारींची दखलही घेतली गेली नाही. चामलवाड यांच्यासोबत अन्य काही कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी होते. मात्र या लोकांवर का कार्यवाही केली गेली नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही माध्यम प्रतिनिधींना व कार्यकर्त्यांना हाताशी धरून प्रकरणाशी संबंध नसल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या प्रकाराकडे पोलीस निरीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. असाही आरोप केला जातोय. दरम्यान एका कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झाली असली तरीही अन्य सहभागी लोकांचे काय याबाबत शंका- कुशंका ऐकावयास मिळत आहेत
पोलीस शिपाई विष्णुकांत चामलवाड यांची बदली अगोदरच झालेली असल्याने त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. टप्याटप्याने अन्य बदली झालेले कर्मचारी सोडण्यात येतील. जुगार प्रकरणात चौकशी सुरू असून कार्यवाही केली जाईल. असे
— विष्णुकांत गुट्टे, पोलीस निरीक्षक त्यांनी सांगितले आहे


