दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी: देगलूर शहरातील जुन्या बसस्थानकात बांधण्यात आलेल्या कंपाउंड वॉलवरून अनेक नागरिक मांस खरेदी करीत असल्यामुळे बसस्थानकात प्रवासासाठी बसलेल्या प्रवासी जनतेला त्रास होत आहे.
देगलूर शहराचे मागील अनेक वर्षांपूर्वी गांधी चौक येथे बसस्थानक होते. वाढती लोकसंख्या, वाढती प्रवासी संख्या आणि वाढत गेलेल्या बांधकामामुळे या ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला म्हणून शहाजीनगर शेजारून जाणाऱ्या देगलूर उदगीर मार्गावर जुने बसस्थानक सुरू करण्यात आले. गेली अनेक वर्षे या बसस्थानकातून नांदेड आणि इतरत्र जाणाऱ्या सर्व गाड्या सोडल्या जात असत. गेल्या कांही वर्षापासून शहरातील काही प्रभावीलोकांनी आपल्या शेतीचे भाव वाढावेत या उद्देशासाठी नवीन बसस्थानक करण्याची आग्रही मागणी केली. ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे सध्या देगलूर शहराला नवीन आणि जुने असे दोन बसस्थानक आहेत. नांदेड, पुणे हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या तसेच जवळच्या गावी जाणाऱ्या बसगाड्या या दोन्ही बसस्थानकातून मार्गस्थ होतात. परिवहन महामंडळाच्या गांड्या बरोबरच इतर खाजगी वाहने देखील नवीन बसस्थानकातून प्रमाणात मिळत असल्यामुळे नवीन बस स्थानकाला जुन्या बसस्थानकाच्या तुलनेत महत्त्व आले आहे त्यामुळे फार मोठ्या संख्येने प्रवासी नवीन बसस्थानकापर्यंत जातात. त्यामुळे साहजिकच जुन्या बसस्थानकाकडे जनतेचे लक्ष कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या दोन-तीन
वर्षांपूर्वीपर्यंत या बसस्थानकाला कंपाउंडवॉल नव्हते. त्यावेळी जुन्या मोठ्या बसस्थानकाच्या पूर्वेला एटीएम सेंटरसह कांही मांस विक्रीची दुकाने सुरू होती. पश्चिमेला देखील एक मांस विक्रीचे दुकान आणि हॉटेल होते. मांस विक्रीचा त्रास प्रवाशांना होत असल्यामुळे बसस्थानकाच्या पूर्वेला कंपाउंड वॉल बांधण्यात आले आहे. परंतु या कंपाउंड वॉलची उंचीफार नसल्यामुळे मांस विक्रेते व मांसखरेदी करणारे नागरिक या कंपाउंड बॉलच्या कमी उंचीचा गैरफायदा घेताना दिसून येत आहेत. बसस्थानकाच्या आतील बाजूला नागरिकांनी किंवा मांस विक्रेत्यांनी मोठ-मोठे ठोकळे उभे केले आहेत. त्यावर उभे राहून नागरीक मांस खरेदी करतात तसेच या ठिकाणी मांस विक्री करणारे दुकानदार अत्यंत उघड्या पद्धतीने कापलेले प्राणी लटकावून मांस विक्री करीत आहेत. त्यामुळेशहरासह ग्रामीण भागातून येवून प्रवासासाठी या बसस्थानकात बांबलेल्या नागरिकांना विशेषतः महिला नागरिक प्रवाशांना खूप त्रास होत आहे. प्रवाशांना होणारा हा त्रास थांबविण्यासाठी देगलूर नगर परिषद प्रशासन, देगलूर आगार प्रमुखांनी कंपाउंड वॉलवरून होणारा मांस विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. अशी प्रवासी जनतेतून मागणी होत.


