दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
तालुक्यातील खरसई पंचक्रोशी मधील खारभूमि लगत असलेल्या बनोटी,रेवली,आगरवाडा,गणेशनगर येथील खारभुमी बंधाऱ्याला सन १९९२ पासुन ठिकठिकाणी भगदाड पडले असल्या कारणाने लागवडीच्या शेत जमीनीत समुद्राचे खारे पाणी शिरून सुमारे ६० एकर जमीन नापीक झाली आहे.येथील शेतकरी खारभुमीत दुबार पीक घेत असत परंतु जुन्या खारभुमीचा बंधारा फुटल्याने मागील २० ते २२ वर्षापासून दुबार पीक घेणे पुर्णतः बंद झाले आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने खारभुमी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून देणे काळाची गरज असल्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम मांदाडकर यांनी वेळोवेळी संबंधित खातेप्रमुख,मंत्री महोदय,आमदार,खासदार,पालकमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.शेतकऱ्यांचे या गंभीर बाबीकडे शासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले असल्याने सदरची खारजमीन आता नापीक झाली असल्याचे मांदाडकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.खरसई पंचक्रोशी मधील खार जमीन दुरुस्त करून मिळावी म्हणुन शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहेत तसेच वारंवार लोकप्रतीनिधींचे लक्ष वेधले आहे.शासन दरबारी अनेकवेळा खेटे मारूनही कोणीच लक्ष घालत नसल्याने आता तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांचे भावनेचा व मागणीचा सहानुभतीपूर्वक विचार करून या भागातील जुनी खारभूमि बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून मिळावी अशी आग्रहाची मागणी परशुराम मांदाडकर यांनी केली आहे.


