
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: इंदापूर तालुका काँग्रेस च्या वतीने महात्मा गांधी यांची पुण्यतिथी इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींना राष्ट्रपिता अशी पदवी मिळाली. तसेच लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असतं. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले.म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात.
भारतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारी रोजी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते आणि प्रत्येकजण त्यांना स्मरण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. बापूंनी सत्य आणि अहिंसा हे इंग्रजांविरुद्धचे सर्वात शक्तिशाली शस्त्र बनवले होते, त्यामुळे आजही त्यांचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस काकासाहेब देवकर , इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे व सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.