
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (मोर्शी) :-मोर्शी तालुक्यातील कोळविहीरजवळ बुधवारी रात्री १० वाजता भरधाव वेगात असलेल्या पिकअप वाहनाने हरणांच्या कळपाला धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन हरणांचा मृत्यू झाला.ज्यामध्ये एक नर आणि दोन शिशु हरिनांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही हरणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील पशु रुग्णालयात पाठवण्यात आले.पशु आरोग्य अधिकारी डॉ.पंकज भोपसे यांनी तीन मृत हरणांचे शवविच्छेदन करून वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.वन कर्मचाऱ्यांनी नियमानुसार तिन्ही हरणांवर अंतिम संस्कार केले.
वनधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पिकअप वाहन चालकाविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास आरएफओ अभिलाष वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी करीत आहेत.