
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली गेली आहे. मागील १० दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेल्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय कार्यालयास चक्क टाळे ठोकून कार्यालयीन कामकाज बंद पाडत आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. दैनिक चालू वार्ता ने यापूर्वीच इशारा देऊन प्रशासकीय यंत्रणेस सजग करण्याचा प्रयत्न केला होता. त्वरीत या प्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार केला जावा असे आम्ही प्रकाशित वृत्ताद्वारे सूचित केले होते.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांचा छडा लागला जावा यासाठी मागील दहा दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले होते. तथापि त्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याऐवजी प्रशासनाने त्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचाच परिपाक म्हणून प्रशासकीय कार्यालयास टाळे ठोकणे भाग पडले गेले. एवढेच नाही तर सदर विद्यार्थ्यांच्या संताप अनावर होऊन त्यांनी प्रशासकिय कार्यालयाचे कामकाजच ठप्प केले आहे. भविष्यात यातही काही सामंजस्य दाखवले न गेल्यास या आंदोलनाचा भडका अधिकच उग्र होऊ शकेल यात शंकाच नाही. पुकारलेल्या आंदोलनाचा भडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी भेटीनंतरच शमला जाईल अशी तीव्रता या आंदोलनाची राहिली गेली तर आणि तरच मुख्यमंत्र्यांना या मागण्यांचा विचार करणे भाग पडू शकेल एवढे मात्र खरे.
रविवार, दि. १२ फेब्रुवारी २३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी परभणीत येणार आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री, राज्याचे कॅबिनेट व राज्य मंत्री, जिल्ह्यातील खासदार,अनेक आमदार यांची मांदियाळी असणार आहे. त्यावेळी ह्या न्याय्य मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत स्वतः कानावर घातल्या तर नक्कीच न्याय मिळू शकेल असा विश्वास बाळगायला हरकत नाही.