
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची पुन:र्स्थापनेसाठी चबुतऱ्याची सोमवारी रात्री उशिरा विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने भव्य असा महाराजांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यात येणार आला. विधीवत पूजेसमयी सर्वपक्षीय नेते, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवभक्तांची उपस्थिती लाभली होती. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली.
परभणी लोकसभेचे शिवसेना खासदार संजय जाधव, जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, पाथरीचे आमदार तथा परभणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष सुरेश वरपूडकर, भाजपाचे शहराध्यक्ष आनंद भरोसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम, माजी महापौर भगवानराव वाघमारे, मराठा समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष सुभाषराव जावळे यांच्यासह विविध पक्षांची अन्य नेते मंडळी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी शिवजयंती उत्सव तोंडावर आला असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे आणि चबुतऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम महानगर पालिकेच्या वतीने युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठीच महाराजांचा हा पुतळा मागील कांही दिवसांपासून मनपाचे विभागीय कार्यालय परिसर कल्याण मंडपम् येथे सुरक्षित ठेवण्यात आला होता. सदर चबुतऱ्याच्या सुशोभीकरणासाठी जो दगड वापरला जात आहे, तो विशेष असा आहे. शिवाय त्यांच्यावर कोरीव पध्दतीने नक्षीदार कलाकृती काढण्यात येत असल्याचे समजते. बऱ्यापैकी काम पूर्ण झाल्यामुळे चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न करण्याच्या इराद्याने काल रात्री तेथे विशेष वाहनातून आणला गेला. सोबतच मोठ्या ट्रेनची यवस्था करुन तेथे पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी महाराजांचे आसन समजले जाणाऱ्या चबुतऱ्याची विविध राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर रात्रौ उशीरा ट्रेनच्या सहाय्याने महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यात आला आहे.
शिवजयंती उत्सव अगदी तोंडावर आला असून शक्य तेवढी सुशोभीकरणाची कामे जोमाने पार पाडली जाणार आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणात बाकी असलेली स्मारक, चबुतरा आणि सभोवतालच्या सुशोभिकरणाची सर्व कामे पूर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
समस्त हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान, जाणता राजा, जागतिक पातळीवर असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति ओतप्रोत भरलेले आहे. किंबहुना त्याच अनुषंगाने अभिप्रेत असलेल्या शिवजयंतीचे औत्सुक्य प्रत्येकाच्या ठायी ठायी असल्यामुळेच ही घाई केली जाणे स्वाभाविक आहे. विशेष तंत्रज्ञ व अभियंते या कामी कटाक्षाने लक्ष देऊन आहेत. महाराजांच्या जयंतीला हा सोहळा मोठ्या दिमाखात, भक्तीमय वातावरणात शहरात सर्वत्र साजरा केला जातो.
प्रशासकीय यंत्रणेबरोबरच कार्यकर्त्यांची बळ या सोहळ्याच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले आहे.
या प्रसंगी किशोर रणेर, अरविंद देशमुख, विठ्ठल तळेकर, अतुल सरोदे, गजानन जोगदंड, अरुण पवार, नितीन देशमुख, राहूल कटींग, सचिन गारुडी, प्रशांत ठाकूर, पंडितराव मोहिते, अमीत काळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी सामील झाले होते.