
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : आंबेडकरी चळवळीचं उदयोन्मुख नेतृत्व तथा शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा पाणी वाटपाच्या किरकोळ कारणावरुन करण्यात आलेल्या खून प्रकरणी लिप्त चारही आरोपींना जन्म ठेपेची सजा ठोठावण्यात आली आहे. सदरचा निकाल परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश – ५ एन्. जी. सातपुते यांनी दिला आहे. आज मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात या निकालाची सुरुवात करण्यात आली. यातील लिप्त रवी वसंत गायकवाड, किरण सोपानराव डाके, मिनाक्षी रवी गायकवाड आणि पार्वती विठ्ठल मोरे या चारही आरोपींना जन्मठेपेची ही संज्ञा ठोठावली गेली आहे. त्यामुळे मृतक रोडे यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त केले गेले आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. सुभाष उत्तमराव देशमुख यांनी सरकारी पक्षातर्फे रितसर बाजू मांडली.
महानगर पालिका नगरसेवक तथा मृतक अमरदीप रोडे, आरोपी रवी गायकवाड, किरण डाके हे एकमेकांचे मित्रच होते. रवी गायकवाड यांचे जायकवाडी परिसरात घर होते. घरातील नळाला पाणी येत नसल्यामुळे रवीने जलवाहिनीला छिद्र पाडून दुसरे कनेक्शन घेतले होते. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांना पाणी येण्याचे बंद झाले होते. परिणामी त्रस्त नागरिकांनी रविच्या या कृत्याविरोधात नगरसेवक असलेले अमरदीप रोडे यांचेकडे तक्रार केली. त्याचा राग येवून अमरदीपने ती नळ जोडणी बंद करु असे तावातावाने सांगितले होते. तर दुसरा आरोपी किरण डाके हा सुध्दा अमरदीप रोडेंचा मित्रच होता. तथापि अमरदीप रोडे वापरत असलेली गाडी ही किरणच्या नावावर होती. सदर गाडीचे हफ्ते भरण्यासाठी रोडे हे देत असलेली हप्त्याची रक्कम किरण बॅंकेत भरतच नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये सुध्दा मागील काही दिवसांपासून वादच सुरु होते.
३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ८ वाजता अमरदीप रोडे हे जायकवाडी परिसरात आले त्यावेळी रवी आणि अमर यांच्यात बाचाबाची झाली. त्याच रागाचे पर्यावसान म्हणून रवी गायकवाड ने कुऱ्हाडीचा जबरी वार अमरदीपच्या मानेवर केला. रक्तबंबाळ झालेल्या अमरने किरणला गाडी काढून रुग्णालयात जाऊ असे म्हणताच गाडीत इंधन नसल्याचे किरणने अमरला सांगितले. तेवढ्यात रवीने तलवार काढून अमरवर जबरी हल्ला चढवला परंतु यष्ठीने धष्टपुष्ट असलेल्या अमरने तलवारीचा घाव हातावर झेलून ती तलवारच वाकवली व नंतर फेकून दिली. तेवढ्यात रवीने पुन्हा कुऱ्हाडीचे वार करण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र आपल्या हत्येचा कुटील डाव रचल्याचे अमरच्या पूरते लक्षात आल्याने त्याने जीवाच्या आकांताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाय आपटून अमर अखेर त्या खड्ड्यात पडला. तेवढ्यात रवी आणि किरण या दोघांनी मिळून खड्ड्यात पडलेल्या अमरदीपच्या डोक्यात दगड घालून अखेर त्या मित्राचाच काटा काढला. पाणी वाटपाच्या किरकोळ कारणावरुन मित्र असलेल्या अमरचा रवी आणि किरण या दोघांनी मिळून सन ३१ मार्च २०१९ रोजी निघृणपणे खून करुन त्यांचे जीवन संपविले. त्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली होती. शहरासह सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी लिप्त आरोपी रवी गायकवाड आणि किरण डाके यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करुन आपल्या गुन्ह्याची कबूली दिली होती.
मागील ती वर्षांपासून आरोपी कारागृहात असलेल्या या गुन्ह्याचा निकाल शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी लागला जाणार होता. तथापि जिल्हा सत्र न्यायालय परिसरात रोडे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी कमालीची गर्दी केली होती. परिणामी कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसली जाऊन जनजीवन विस्कळित होऊ शकेल, याचे गांभीर्य वेळीच ध्यानी घेऊन माननीय न्यायालय सुत्राने शनिवारी लागला जाणारा हा निकाल राखून ठेवत तो आज मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी देण्यात येईल,असे जाहीर केले होते.
या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मृतक अमरदीप रोडे यांचे भाऊ धम्मदीप रोडे यांनी शासनाकडे सरकारी वकील म्हणून ॲड. सुभाष उत्तमराव देशमुख यांची नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती. याप्रकरणात एकूण २५ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. न्यायालयाने आरोपी रवी गायकवाड व किरण डाके यांना अजन्म सश्रम कारावास, रुपये पाच हजारांचा प्रत्येकी दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास आणि आरोपी मिनाक्षी गायकवाड, पार्वती मोरे यांना अजन्म कारावास व प्रत्येकी रुपये एक हजारांचा दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान या खळबळजनक अशा खून खटल्याचा निकाल काय आणि कसा लागला जातो, हे ऐकण्यासाठी न्यायालय परिसरात रोडे समर्थक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचाच परिपाक म्हणून न्यायालय व्यवस्थापनाने सुध्दा कमालीची खबरदारी घेतल्याचे दिसून आले. न्यायालय व परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे दिसून आले आहे.
पोलीस अधीक्षक रागसुध्दा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनि. कपिल शेळके, पोउपनि.सुरेश चव्हाण, सपोउपनि. शिवाजी भांगे, कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.