
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानक परिसरातील कांही प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्यासंदर्भात केलेल्या हालचाली विरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत आयोजित धरणे आंदोलनातील खरी आक्रमकता काय असते हे दाखवून दिले. लोको शेड ऐवजी इलेक्ट्रीकल शेड व अन्य मागण्यांकरिता पूर्णा रेल्वे संघर्ष समितीने आज बुधवार, दि.८ फेब्रुवारी २३ रोजी अगदी सकाळी ८ वाजल्यापासूनच जोरदार धरणे आंदोलन अंमलात आणले. तब्बल दुपारी दोन वाजेपर्यंत आक्रमकतेने सुरू राहिलेल्या या धरणे आंदोलनात संतप्त पूर्णेकर जनतेने तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत सरेल्वे स्थानकाचा व प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा संपूर्ण परिसर आसमंत दणाणून सोडला.
रेल्वे संघर्ष समितीने पुकारलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना, व्यापारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेऊन प्रशासकीय दंडेली विरोधात कमालीची एकजूट दाखवून दिली. आंदोलन कर्त्यांनी रेल्वे प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला, धिक्कार केला. रेल्वे प्रकल्पाच्या स्थलांतरित कुटील नीतीला जे कोणी छुपा पाठिंबा देत आहेत, त्यांचाही यावेळी आंदोलन कर्त्यांनी धिक्कार केला.
आजच्या आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व ध्यानी घेऊन पूर्णा शहरातील संपूर्ण बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, उद्योग-धंदे कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तर रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट दिसत होता. पूर्णा संघर्ष समिती, डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, सर्वधर्मीय आणि सर्वच क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने पूर्णा जंक्शन येथील रेल्वेचे अनेक प्रकल्प नांदेड, जालना व इतरत्र यापूर्वी तर हलविले आहेतच त्याशिवाय आता जे काही शिल्लक राहिले आहेत ते व प्रस्तावित प्रकल्पही अन्यत्र हलविले जावेत यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत, नव्हे त्यासाठीचा कुटील डाव खेळला जातो आहे, त्याविरोधातच समस्त पूर्णा वाहिन्यांचा रोष अनावर झाला आहे. त्या विरोधात तीव्र पडसादही उमटले जात आहेत. त्याचाच परिपाक म्हणून पूर्णा संघर्ष समितीने दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात आजचा हा संघर्षात्मक पवित्रा घेतला होता. तीव्र धरणे आंदोलनाचा घेतलेला निर्णय समस्त नागरिकांनी उचलून धरत नियोजित संघर्षात एकजूट कमालीची दाखवून देत मोठा प्रतिसाद दिला हे विशेष म्हणावे लागेल.
आंदोलन कर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात ज्या काही मागण्या नमूद केल्या आहेत, त्यात लोको शेड ऐवजी इलेक्ट्रीकल शेड पूर्णा येथे उभारले जावे, पूर्णेतून केले जाणारे कर्मचाऱ्यांचे स्थलांतर त्वरीत थांबविले जावे, प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर तिकीट खिडकी सुरु करण्यात यावी, रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जावी, विशेष गाड्यांच्या नावाखाली जनतेची केली जाणारी भरमसाठ आर्थिक लूट वाढीव तिकीट दर त्वरीत कमी करुन ती थांबविली जावी या व अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश केला आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या याच दंडेलीच्या निषेध करीत पूर्णा येथील यापूर्वीचे व प्रस्तावित प्रकल्प अन्यत्र पळवण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याविरोधात ‘चालू वार्ता ‘ या मराठी दैनिकाने सातत्याने वृत्त प्रकाशित करुन मागील अनेक दिवसांपासूनज्ञआवाज उठवून जनतेमध्ये जागृती करण्याचे काम चालविले आहे, हे पूर्णा शहरच नव्हे तर परभणी या निजामकालीन जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेला ध्यास आहे. जेथे जेथे हे प्रकल्प पळविले जात आहेत, त्या त्या शहरांचा किंवा ठिकाणांचा विकास होऊच नये, ही आमची धारणा नाहीय, किंवा त्यांच्या त्या विकासात्मक धोरणाला ही आमचा कोणताही विरोध नाही, नव्हे तो राहाणारही नाही परंतु पूर्णा येथील प्रकल्प न पळवता व तेथे पूर्वीपासूनच जे आहेत, जे प्रस्तावित आहेत, त्यांना पूर्णा येथेच कायम ठेवून दुसरे मंजूर करावेत, ते घ्यावेत किंवा आणले जावेत, अशी आमची निस्पर्हणीय अशी मागणी आहे, ती राहिली जाईल, यात तिळमात्र शंका नसावी. तथापि जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी आजच्या आंदोलनासाठी पूर्णा येथे उपस्थिती लावली असती तर आंदोलन कर्त्यांचे बळ आणखी वाढले असते. जनतेलाही कळले असते, आमदार मेघना बोर्डीकर या भाजपाच्या असूनही केंद्र सरकारच्या तथा त्यांच्या आदेशाने चालणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रशासकीय धोरणाविरोधात जनतेच्या बरोबर आहेत, असे विश्वासाने वाटले असते परन्तु तसे काहीच झाल्याचे दिसून आले नाही. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रातील विरोध ध्यानी घेऊन कदाचित त्यांनाही केंद्राने सावधानी व सबूरीची समज दिल्याचे दिसून येत असावे.