
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे :- एकीकडे धूलिवंदन साजरे करताना लाखो रुपयांची धुळवड करणारी तरुणाई पाहायला मिळत असताना दुसरीकडे समाज्यात आजही अशी अनेक मुलं आहेत कि,जी जन्माला माणूस म्हणून आली खरी मात्र मनुष्य जन्मातील खऱ्याखुऱ्या आनंदापासून कोस दूर आहेत याचीच सामाजिक जाणीव ठेऊन समाज्यातील वंचित घटकातील अनेक मुलांच्या आयुष्यात आनंद आणि जगण्याची नवीन ऊर्जा निर्माण होऊन त्यांनीही मुख्य प्रवाहात यावे या प्रामाणिक उद्देशाने गेली २७ वर्षे धुलीवंदनाच्या निमित्ताने अविरत चालु असलेल्या “रंगबरसे” या रंगोत्सवाचे आयोजन समाजकार्यात कायम अग्रेसर असलेल्या डाँ. मिलींद भोई यांच्या भोई प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी मोठ्या दिमाखात करण्यात आले होते.
समाज्यातील अनाथ,एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारे मुले, रस्त्यावर फुगे विकणारी मुले, डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुले, मतिमंद मुले, अंध आणि अपंग मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, देवदासी भगिनींची मुले या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यासोबत धूलिवंदन साजरे करण्यात आले यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर दररोजच्या अत्यंत हलाकीत आयुष्य जगणाऱ्या मुलांना आनंदात एकमेकांना रंग लावताना आणि पाण्यात भिजताना पाहून उपस्थितांना व आयोजकांनाही वेगळेच समाधान मिळाल्याचे चित्र दिसून येत होते.
या रंगोत्सवाच्या निमित्ताने श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टच्या वतीने यावर्षी मुलांसाठी सकाळी ८ ते ९ पर्यंत खिचडी व शिरा उपलब्ध करून देण्यात आला.
या रंगोत्सवात पोलीस बँड द्वारे सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर व श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त श्री प्रताप भोसले यांच्या हस्ते पाण्याच्या टँकरचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी मुलांना जादूचे प्रयोगही दाखवण्यात आले.डाँ. मिलींद भोई यांच्या तर्फे ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेंद्र वाईकर यांचा सत्कार करण्यात आला.