
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
ज्येष्ठ साहित्यिक स्मृतीशेष एफ. एन. कसबे तथा विजयानंद यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या औचित्यावर आज बुधवार ( दि. १५ ) रोजी एफ. एन. कसबे यांच्या अनेक स्मृती जतन करणाऱ्या ‘जीवनयात्री: एक संघर्षगाथा’ या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यात या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि विचारवंत प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रा. डॉ. सारिपुत्र तुपेरे, प्रा. डॉ. बाळासाहेब मागाडे, के. व्ही. सरवदे, रमेश बोर्डेकर, पंडित कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
थिंक टँक पब्लिकेशन्स ॲन्ड डिस्ट्रिब्युशन्स या प्रकाशन संस्थेमार्फत या स्मृती ग्रंथाची निर्मिती केली असून या स्मृतीग्रंथाचे संपादन विशाल शिवाजीराव वाघमारे आणि संघरत्न फकिरचंद कसबे यांनी केले आहे तसेच या स्मृतीग्रंथात एकूण २६ जणांनी लेख लिहून एफ.एन कसबे यांच्या जीवन कार्यावर आणि स्मृतींवर प्रकाशझोत टाकला आहे. हा प्रकाशन सोहळा शुभ मंगल कार्यालय, मोहा रोड़, कळंब येथे सकाळी ११:०० वाजता होणार असून या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल वाघमारे आणि संघरत्न कसबे यांनी केले आहे.