
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर : शेटफळ हवेली येथील सद्गुरु बाळूमामा यांचा भंडारा हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज (दि.२०) संपन्न झाला. या निमित्ताने मामांच्या पालखीचा सहवाद्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला. या मिरवणुकीत १ टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पिवळ्या भस्माच्या उधळणीमुळे येथील सर्व रस्ते पिवळे धमक झाले आहेत. पारंपारिक वाद्याचा गजर, डॉल्बीचा ठेका, हलगी, ढोल पथक आदी वाद्य पालखी सोहळ्याला लाभली. बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत बाळूमामाचे भक्तगण भंडाऱ्याची उधळण करत होते.
कोणताही अनुचित प्रकार न होता भंडारा सुरळीत पार पडला. पालखी सोहळ्यामध्ये अश्व सहभागी झाले होते. यावेळी बिरदेव वालुग मंडळ एरंडोली यांनी केलेला नाच लक्षवेधी ठरला. या काळात मामांच्या मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई आकर्षक ठरली. मंदिरात केलेली विविध रंगांच्या फुलांची सजावट व मंदिर परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन बाळूमामा भंडारा उत्सव कमिटीने उत्कृष्ट असे नियोजन केले होते.मामांचे दर्शन सुलभ झाले यामुळे भाविकात समाधानाचे वातावरण दिसत होते.सकाळी अभिषेक व आरती
आज सकाळी अभिषेक व आरती करण्यात आली.तीन वाजता बाळूमामांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बिरदेव वालुग मंडळ एरंडोली यांचा ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्याची आतषबाजी, हलगी घुमक्याचा ताल, लेझीम, बँड अशी पारंपारिक वाद्य वापरत डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई दंगून गेली. बाळूमामाच्या नावानं चांगभलंत सारा गाव दुमदुमून गेला होता.
त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मामांची आरती झाली.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा सुमारे पाच हजार भाविकांनी लाभ घेतला.व रात्री ८ वाजता मामांचे सेवक प्रबोधनकार बाळूमामांच्या नावानं चांगभलं मालिकेतील कलाकार मेजर विक्रम सुर्यकांत जगताप यांच प्रवचन झाले. भंडारा उत्सवाला यात्रेचे स्वरूप आले होते.