
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी -वसंत खडसे
वाशिम : ईतर बहुजन कल्याण विभागा अंतर्गत येणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ वरिष्ठ वेतश्रेणीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांनी विधान परिषदेत बोलतांना केली.
विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या विधान परिषदेत प्रखरपणे मांडत असताना आमदार ऍड. सरनाईक म्हणाले की, सर्वच शासकीय, निमशासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाढीव वेतश्रेणीचा लाभ दिला जातो. परंतु सदर लाभापासून इतर बहुजन कल्याण विभागा अंतर्गत येत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वंचीत आहेत. महाराष्ट्रामधे एकूण १४७ शाळा असून त्यामधे जवळपास ११२९ कर्मचारी कार्यरत आहेत. आशा आश्रम शाळेतील बऱ्याच कर्मचाऱ्यांचे सेवेची १५ ते २० वर्षे पूर्ण झालेली असताना सुद्धा, अद्याप पर्यंत त्यांना वाढीव वेतश्रेणीचा लाभ मिळाला नाही. हा उपरोक्त कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे मोठा अन्याय होत असून, सदर कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणीचा सामना करत आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे सबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून वंचीत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरीत वरिष्ठ वेतश्रेणीचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांची बाजु मांडतांना विधान परिषदेत केली.