
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे – एकीकडे अनेक संकट आणि अडचणींना सक्षमपणे तोंड देत संसाराचा गाडा पुढे नेत असताना दुसरीकडे तेव्हढ्याच जिद्दीने आपल्याला अवगत आणि आवडीच्या ढोलकीवादन या कलेसाठी स्वतःला जोखून देऊन कला क्षेत्रातील ढोलकीवादनात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत एक महिला ढोलकीवादक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेल्या पुण्यातील धनकवडी भागात राहणाऱ्या महिला ढोलकीवादक सौ. लक्ष्मी कुडाळकर-लांबे यांना स्वप्नल फाउंडेशन कडून दिला जाणारा मानाचा सन २०२३ च्या राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
वयाच्या १३ व्या वर्षांपासून ढोलकीवादन करणाऱ्या लक्ष्मीताईंचा जन्म पुणे जिल्यातील जेजुरी येथे झाला असून त्यांचे वडील विठ्ठल कुडाळकर हे उत्कृष्ट ढोलकीपटू होते त्यांचेकडूनच लक्ष्मीताईंनी ढोलकीवादनाचे धडे घेतले तर प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर यांच्या त्या भाची आहेत.लक्ष्मीताईंचा विवाह कला क्षेत्रातील उत्तम किबोर्ड वादक असलेल्या निलेश लांबे यांच्यासोबत झाला असून कला क्षेत्रात कार्यरत असल्याने पतीकडून लग्नानंतरही आवश्यक तो पाठिंबा मिळाल्याने लक्ष्मीताईंनी आपली कला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पोहचविली आहे.
सन २०११ मध्ये झी मराठीवरील “मराठी पाऊल पडते पुढे” या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या लक्ष्मीताईंनी आपल्या बोटांच्या जादूने ढोलकीला बोलती केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे तर अकलूज लावणी महोत्सवात २००५,२००७ आणि २०१५ साली राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक,बालगंधर्ब सन्मान सोहळ्यामध्ये महिला ढोलकीवादक म्हणुन पुरस्कार तसेच मुंबई मध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवात जगप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे हस्ते ढोलकीमध्ये पहिले पारितोषिक लक्ष्मीताईंना मिळाले असून आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन सिने अभिनेते प्रदीप देवकर याचे हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी लेखक व चित्रपट निर्माते संदीप राक्षे हे होते यावेळी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथक प्रमुख भानुप्रताप बर्गे,होम मिनिस्टर खेळाचा बादशहा फेम बाळकृष्ण नेहरकर, माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर,सुनील हिरुरकर (आय जी),माजी पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव,मा. नगरसेविका रेखा खोपकर व डॉ.राजेंद्र भावळकर आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम स्वप्नल फाउंडेशन व रुपाली जाधव यांचे सहयोगाने आयोजित करण्यात आला होता तर याच्या यशस्वीतेसाठी स्वप्नल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ,उपाध्यक्ष रवी सामंत,कार्याध्यक्ष मयूर बल्लाळ ,सई गोंधळेकर,उज्वला गायकवाड,सुजाता दळवी यांनी विशेष प्रयत्न केले.