दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील धारासूर येथील 12 व्या शतकातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या पहिल्या टप्प्यातील प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या मंदिरा विषयी छत्रपती संभाजी नगर येथील मंदिर स्थापत्य अभ्यासक डॉ.कामाजी डक यांनी सलग चार वर्ष या मंदिराचा अभ्यास करून या मंदिराविषयी माहिती मिळवली आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारासूर हे गाव गंगाखेड शहरापासून 27 कि.मी. अंतरावर तर परभणी या जिल्हा स्थानापासून 35 कि.मी. अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या सुमारे 40 फुट उंचीच्या प्राचीन पांढरीच्या टेकडीवर साधारणत: 12 व्या शतकातील गुप्तेश्वर मंदिर स्थित आहे. गोदावरी नदीच्या या धारेत विशाल शिवलिंग असल्याने या गावास धारासून असे नाव पडले असा प्रवाद आहे. धारासुर या असुरांच्या नावावरुन या गावाचे नाव पडले असावे असे देखील म्हटले जाते.
धारासूर येथे असलेले गुप्तेश्वर मंदिर हे उत्तर चालुक्यकालीन आहे. यालाच कल्याणचे चालुक्य असे म्हटले जाते. ‘कल्याणचे चालुक्य’ हे या वंशाचे नाव त्यांच्या राजधानीच्या स्थलनामावरुन प्राप्त झाले आहे. कल्याण किंवा कल्याणपूर हे नगर बसवकल्याण या नावाने ओळखले जाते.
मराठवाडयात असलेल्या इतर कल्याणच्या चालुक्यांची मंदिरे ही आपणास त्यांच्या स्थापत्यशैलीवरुनच ओळखावी लागतात कारण की, महादेव मंदिर, अन्वा, कंकालेश्वर मंदिर, बीड, खडकेश्वर मंदिर, जामखेड इत्यादी मंदिरांवर शिलालेख नाहीत.
त्याच प्रमाणे गुप्तेश्वर मंदिर धारासूर येथे देखील शिलालेख उपलब्ध नाही. मंदिराच्या स्थापत्यावरुनच हे मंदिर चालुक्यकालीन आहे असे आपणास सांगावे लागते. चालुक्यकालीन स्तंभ, जंघा भागात असलेली सुरसुंदरी व देवतांची शिल्पे, पंचायतन व रेखीव व्दारशाखा, असे बरीच उदाहरणे चालुक्यकालीन स्थापत्यांची येथे असलेली दिसून येतात.
धारासूर गावातच गुप्तेश्वर नावाने ओळखले जाणारे चालुक्यकालीन मंदिर 2.40 मी. उंच अशा अधिष्ठानावर उभे आहे. अधिष्ठानास आठ पायऱ्या आहेत. मुख्य अधिष्ठानावर प्रदक्षिणापथ आहे. या प्रदक्षिणा पथाच्या खालील बाजूस लगतच गजथर आहे. यावर एक मीटर उंचीचे उपपीठ आहे. या उपपीठास गजथर, पुष्पथर, मकरथर असून प्रवेशव्दारालगत कट शिखरांची रांग आहे. मंदिराची रचना गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि अर्धमंडप ज्यांना बाजूला कक्षासने आहेत अशी आहे.
गुप्तेश्वर मंदिर हे पुर्वाभिमुख असून उत्तर व दक्षिणेकडूनही प्रवेशव्दार आहेत. पुर्व व उत्तर, या दोन्ही बाजूंनी त्यास उतरत्या छताचे, चार वामन (अर्ध) स्तंभावर कक्षासनयुक्त अर्धमंडप आहेत.
या मंदिराच्या मुख मंडपाच्या पूर्व दिशेला मुख्य प्रवेश असून समोरील भागात दोन्ही बाजूला दोन देवकोष्ठ आहेत. सद्य: स्थितीत हे देवकोष्ठ मुर्ती विरहीत असून यास लहान शिखर आहेत. या बाजूने एकूण आठ पायऱ्या असून त्या चढून आपण वर गेल्यावर आदिष्ठाण लागते. यावर एक मिटर उंचीचे उपपीठ आहे. या उपपीठास चार पायऱ्या आहेत. या मुखमंडपाच्या प्रवेशव्दारासमोर दोन पूर्ण स्तंभ असून बाजूला चार वामनस्तंभ आहेत. तसेच मुखमंडपात कक्षासन असून या कक्षासनास पाटशिळा देखील आहे. या मुखमंडपाच्या बाहेरील बाजूला जाळीयुक्त स्तंभाचे नक्षीकाम दिसते. तसेच खाली छोटया अर्धस्तंभामध्ये मानवी आकृती व सुरसुंदरीचे शिल्प आहेत. उपपीठास गजथर, पुष्पथर, मकरथर असून प्रवेशव्दारालगतच कटशिखरांची रांग आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेश आहे. द्वारशाखा ही चार चार शाखांची असून यात व्यालशाखा, स्तंभशाखा, मनुष्यशाखा आणि चौथी पत्रशाखा आहे. वरील भागात गंधर्व हातात माळा घेऊन दाखविले आहेत. तर खालील बाजूस किर्तीमुखास वाद्यवृंध व मंदारक आहेत. गणेशपट्टीवर उत्तररंगशिळा आहे.
उत्तर दिशेला देखील अर्धमंडप असून या बाजूले देखील मंदिरात प्रवेश करता येतो. मुखमंडपाप्रमाणेच या अर्धमंडपास देखील दोन्ही बाजूला दोन देवकाष्ठ आहेत. मात्र ही दोन्ही देवकोष्ठ मुर्तीविरहीत असून यास लहान शिखर आहेत. अर्धमंडपात जोडस्तंभ असून ते ठेंगणे आहेत. या लगत वातायण दगडी जाळी आहे. या बाजूने एकूण आठ पायऱ्या असून त्या चढून आपण वर गेल्यावर आदिष्ठाण लागते. यावर एक मिटर उंचीचे उपपीठ आहे. या उपपीठास देखील चार पायऱ्या आहेत. या अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एक पुर्ण स्तंभ (बहुदा येथे दोन स्तंभ असावेत) असून बाजूला चार वामनस्तंभ आहेत. तसेच अर्धमंडपास देखील कक्षासन असून या कक्षासनास पाटशिळा देखील आहे. या अर्धमंडपाच्या बाहेरील बाजूला जाळीयुक्त स्तंभाचे नक्षीकाम दिसते. तसेच खाली छोटया अर्धस्तंभामध्ये मानवी आकृती व सुरसुंदरींची शिल्प आहेत. या उपपीठाच्या द्वाराच्या खालील बाजूस निधी दाखविण्यात आला आहे. धनाची पिशवी घेतलेली दोन कुबेराचे प्रतिनिधी दाखविण्यात आले आहेत. संपत्तीने भरपूर असे हे मंदिर आहे. मंदिर हे वैभवशाली असल्याचे हे प्रतिक आहे. बाजूला दोन चौरीधारी सेविका आहेत. तसेच दोन वैष्णव द्वारपाल दाखविण्यात आले आहेत. ललाटबिंबावर गणेशाचे अंकण आहे. बाजूनी प्रवेशद्वास एकूण चार शाखा आहेत.
याच प्रमाणे दक्षिण दिशेला देखील अर्धमंडप असून या बाजुंनी देखील आतमध्ये प्रवेश आहे. मात्र या बाजूंनी असलेल्या अर्धमंडपाची पडझड झालेली आपणास दिसून येते. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबाचा भाग देखील पडला आहे. खालील प्रवेशद्वाराच्या चार शाखा मात्र शिल्लक आहेत. या बाजूंनी मंदिराच्या सभामंडपात पाणी येत असल्यामुळे आमदार निधीतून साधारण 30 वर्षापूर्वी या बाजूंनी आधुनिक विटांचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांची दगडे देखील सरकली आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे मराठवाडयात असलेले हे चालुक्यकालीन मंदिरास शिखर आहे. मराठवाडयातील मंदिरास शिखर नाहीत असे काही इतिहासकारांचे मत आहे. मात्र हे मंदिर आपण पाहिल्यावर या मंदिराचे शिखर आज देखील चागल्या स्थितीत आहे. सुकनाशिकेचा काही भागाची मात्र पडझड झाली आहे. या मंदिराला विटाचे शिखर आहे.
सभा मंडपाच्या तिन्ही बाजूंनी अप्रतिम आणि कलात्मक जाळी आहे. अखंड पाषाणातून कोरलेली ही जाळी शिल्पकाराच्या छन्नी हातोडीतले सामर्थ्य दर्शविते. 24 फूट X 24 फूट च्या प्रशास्त सभामंडपाच्या मधोमध 12 फूट x 12 फूट आकाराची रंगशिळा दिसते. या रंगशिळेच्या चार कोपऱ्यावर असलेले स्तंभ, त्यांच्यावरील शिल्पाविष्कार, किर्तीमुख, सारेच स्तंभित करणारे आहे. रंगशिळेच्यावर छतावर असलेली पद्मकमळाचे शिल्पांकन दहाव्या बाराव्या शतकातील महाराष्ट्राच्या शिल्पकारांची अप्रतिम अदाकारी ठरावी. किर्तीमुखांचे शिल्पकाम विशिष्ट कलाशैलीचा संकेत देतात. छतावरील तुळयाही कोरीवकामाने नटलेल्या आहेत. रगशिळेचे स्तंभ अतीशय रेखीव आहेत.
अंतराळ :-
रंगशिळेच्या पुढे बंदीस्त अंतराळ आहे. या अंतराळास आता लोखंडी गेट बसविण्यात आले आहे. बाजूस दोन स्तंभ असून या स्तंभालगत जालवातायन आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा अकिंत करण्यात आलेली आहे. अतंराळाचे मोजमाप साधारण 8 फूट X 8 फूट असे आहे.
गाभाऱ्याची (गर्भगृहाची) द्वारशखेवर अप्रतिम कलाविष्कार दर्शविणारी कलाकृती आहे. गाभाऱ्याचे द्वार पंचशाखायुक्त आहे. अपराजित पृच्छामध्ये शाखांच्या संख्येवरुन त्यांने नावे दिली आहेत. यामध्ये पंचशाखास नंदिनी असे नाव देण्यात आले आहे. गर्भगृहाची द्वारशाखा नंदिनी प्रकारातीलच आहे. मंदिराची स्तंभ कोणत्या प्रकारचे असतात याचे प्रतिकच लहान आकारात या द्वारशाखावर कोरलेले असते तसे ते इथेही आहे. द्वारशाखेच्या दोन्ही बाजूस गंगा, यमुना, चामरधारिणी व वैष्णव प्रतिहार आणि सैनिकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. उंबरवठ्यावर मंडारक, दोन्ही बाजूस कीर्तीमुख समोर पायथ्याशी चंद्रशिळा असून ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. द्वारपट्टीच्या उत्तरांगावर पाच लहान देवकोष्ठ असून वैष्णव शैव शक्ती, मरुत व किन्नर, योगसाधकाच्या लहान मूर्ती त्यात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्यामध्ये आधुनिक पध्दतीने एक चौकोणी ओठा दगड विटा व सिमेटच्या सहाय्याने बांधण्यात आला आहे. व या मध्ये छोट्या शिवपिढीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिल्पकलेने नटलेल्या या मंदिरात पूर्वी केशवराजाची मूर्ती होती असे गावकरी सांगतात. सध्या गावातीलच दुसऱ्या मंदिरात ही अप्रतिम मूर्ती ठेवण्यात आली आहे. केशवराजाच्या या मूर्तीच्या वरील भागात दशअवतार कोरण्यात आलेली आहेत.
गुप्तेश्वर मंदिराच्या बाह्यभागावरील शिल्पे, खजुराहो येथील शिल्पासारखी सुंदर आहेत. मंदिराच्या जंघा भागावर मिथुन शिल्पे आहेत. यातील अप्सरांचे शिल्पांकन अतिशय सुंदर आहे. या शिल्पांमध्ये सजिवता दिसते. यापैकी काही हातात आरसा घेऊन कुंकुम तिलक लावणारी दर्पना, पत्र लिहिणारी पत्रलेखीका, पोपटाला द्राक्षे भरविणारी शुकसारीका, पुत्रवल्लभा, विषकन्या, रुपगर्विता यासारख्या सुरसुंदरी तसेच इतर अनेक आकर्षक शिल्पे आहेत. यातून कलाकाराच्या कल्पकतेची साक्ष पटते. हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 नुसार राज्यसंरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर स्थापत्य अभ्यासक डॉ.कामाजी डक यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना दिली.
