
दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . भारत हा युवकांचा देश आहे . देशाला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी युवकांचा पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे . त्यांच्या सहभागा शिवाय देश प्रगती करणे शक्य नाही असे विचार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. बी.व्ही.पुल्लागोर यांनी प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिणे , प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याता प्रा.डॉ. बी.व्ही.पुल्लागोर , प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते हे उपस्थित होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. भारत केंद्रे यांनी केले .
डॉ. पुल्लागोर यांनी भाषणात जाती , धर्म , पंथाच्या पुढे जाऊन माणुसकी जपली पाहिजे . सामाजिक जाणीव उराशी बाळगून समाजातील गरीब , दुःखी , पिडीत यांना भारतीय संविधानाकडून मिळालेली संधी उपलब्ध करून दिली तर समाज आणि देश आत्मनिर्भर बनू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे देशाला दिशा देण्याचे कार्य अखंडपणे करीत आहेत असे विचार मांडले . अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी राष्ट्राच्या पाया भरणीमध्ये भारतरत्न व प्रज्ञापुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे . भारतीय संविधान जगासमोर नवा आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण आहे . संविधानाच्या अंगीकारातून माणसामध्ये संवेदनशीलता निर्माण होते असे विचार व्यक्त केले . यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांची उपस्थिती होती .