
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे,खते,कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक महसूल भवनात झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने,कृषी उपसंचालक अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ८१ हजार हेक्टर असून सोयाबीन,कापूस,तूर ही मुख्य पीके आहेत.गतवर्षी खरीप पिकाचे ६ लाख ७४ हजार हे.पेरणी क्षेत्र होते.येत्या हंगामासाठी सोयाबीन,कपाशी,तूर,मूग,ज्वारी,उडीद व मका आदी पिकांसाठी ८३ हजार २४ क्विंटल बियाण्याची गरज आहे.सोयाबीन या मुख्य पीकासाठी ६६ हजार ९३८ क्विंटल,कपाशीसाठी ५ हजार ८५० क्विंटल व तुरीसाठी ४ हजार ७४६ क्विंटल बियाणे लागणार आहे.धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो.त्यामुळे मक्याचे ३ हजार ६०० क्विंटल बियाणे लागणार आहे.शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध असावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही व्हावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
युरिया,एसएसपी,डीएपी,संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी १ काम १४ हजार ३१० मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी ४५ हजार ४७ मे. टन खतसाठा उपलब्ध आहे.उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत सर्वदूर उपलब्ध राहील यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा.त्याचप्रमाणे,सरळ खतांचा वापर वाढविणे,ठिबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत.खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुक्यांचे रेकनिहाय नियोजन करावे,असे निर्देश श्रीमती कौर यांनी दिले.
गत खरीप हंगामात १ हजार ४०० कोटी रू. पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते.ते १ हजार ३२७.८० कोटी पर्यंत साध्य झाले आहे.पुढील हंगामासाठी १ हजार ४५० कोटी उद्दिष्ट असून,ते साध्य करण्यासाठी वेगाने कार्यवाही करावी.गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा.पीक विम्याबाबत १३ हजार ७०० शेतकरी बांधवांना पूर्वसूचना प्राप्त असून,ते पात्र आहेत.त्यांना तत्काळ विम्याचा लाभ मिळवून द्यावा.कृषी पंप वीज जोडणी,तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी प्रलंबित अर्ज निकाली काढून संबंधितांना लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अनधिकृत बियाणे,बोगस खते आदी आढळल्यास गुणनियंत्रण विभागाकडून कार्यवाही होत आहे.गतवर्षी सोयाबीनचे ३६ लक्ष ७३ हजार रू. किमतीचे २१४.७५ क्विंटल बियाणे,तसेच ७ लक्ष ९५ हजार रू. किमतीचे १६.२० मे. टन बोगस खत आणि ४ लीटर अनधिकृत कीटकनाशक जप्त करण्यात आले.गतवर्षी कृषी निविष्ठांचे २ हजार ३६० नमुने काढण्यात आले.त्यात १९४ कोर्टकेस पात्र नमुने आढळले. त्याचप्रमाणे,पाच प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून,२१ परवाने निलंबित करण्यात आले आहेत,अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.सातपुते यांनी सादरीकरणातून दिली.