
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी – वसंत खडसे
वाशिम : अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे भारत चीन सीमेवर देशाच्या रक्षणार्थ कर्तव्यावर असताना अचानक ओढवलेल्या नैसर्गिक संकटात वाहून जाणाऱ्या आपल्या सहकारी जवानांना वाचवण्याच्या प्रयत्नात सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे हे नुकतेच शहीद झाले आहेत. त्यांना वीरमरण पत्करावे लागल्यामुळे, त्यांच्या विर पत्नी वैशालीताई गोरे व दोन चिमुरडी मुल कायमस्वरुपी अनाथ झाली आहेत. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण व देशसेवेचे धडे देऊन देशाच्या सैन्यदलात दाखल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शहीद अमोल गोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार स्तंभ संपूर्णतः ढासाळला आहे. त्यांना आर्थिक मदत करण्याचे हेतूने विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला असून, हुतात्मा अमोल गोरे यांच्या वीर पत्नी वैशालीताई गोरे यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कडून करण्यात आले आहे.
जवानांविषयी प्रेम, कृतज्ञता आणि गौरव हा प्रत्येकाच्या मनात दाटलेला असतोच, पण जीवन कसे जगावे यापेक्षा ते देशासाठी कसे झुगारावे हे सांगणाऱ्या ” या तो तिरंगा लहराके आऊंगा ! या तिरंगा मे लपेटके आऊंगा !! हे कोवळ्या वयातील पॅरा कमांडो अमोल गोरे यांचे उद्गगार कानात घुमले की, आजही ऊर अभिमानाने भरून येतो. अखेर शहीद गोरे यांनी उद्गगारलेले वाक्य सत्यात अवतरले आणि ज्या पेटीतून आपल्या चिमुकल्यांना हवी असणारी खेळणी, खाऊ आणायचे त्याच पेटीत तिरंग्यात लपेटून अमोल गोरे घरी परतले. आणि क्षणात होत्याचे नव्हती झाले. संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली उपस्थितअसणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचे बांध वाहू लागले. तर प्रत्यक्षात ज्यांच्यावर हा दुःखाचा पहाड कोसळला त्या शहीद गोरे यांच्या वीर पत्नी वैशालीताई गोरे, त्यांची दोन चिमुकली मुलं, वृद्ध आई-वडील व भाऊ यांचा आकांत तर शब्दात लिहिणे अशक्यच.. घरातील करता कमावता एकमेव आधार असलेले अमोल गोरे शहीद झाल्याने, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन त्यांना आर्थिक बळ व मदत देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून जवानांप्रती प्रेमभाव, कृतज्ञता आणि गौरव असणाऱ्या असंख्य व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचावा या भावनिक हेतूने, माध्यमातून शहीद अमोल गोरे यांच्या वीर पत्नी वैशालीताई गोरे यांच्या दर्शविलेल्या सदर बँक खाते नंबर व QR कोड वर आपापल्या स्वईच्छेने आर्थिक मदत करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती माँ रेणुका मेडिकल एजन्सीचे संचालक श्री सुनील खडसे पाटील यांनी दिली आहे.