
मृतकांमध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश.
दुभाजक ठरलं दुर्घटनेचं कारण.
बसचे दार खाली दबले, काचा फोडून काहींनी वाचवले प्राण.
वसंत खडसे
उपसंपादक वाशिम
वाशिम : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात येत असलेल्या पिंपळखुटा गावा नजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या एमएच २९ बीई १८१९ या क्रमांकाच्या खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्यामुळे २५ निष्पाप प्रवाशांच्या आयुष्याचा कोळसा झाला. मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्घटनेत २५ लोक जिवंत जळाले. या मृत्यूच्या तांडवात कॉलेजच्या मुलींचा व चार लहान मुलांचा सुद्धा बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर दुर्घटनाग्रस्त बस रस्ता दुभाजकाला धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा कारण पुढे येत आहे. अपघातग्रस्त बसचे दार खाली दबल्यामुळे बाहेर पडण्यासाठी चा मार्ग बंद झाला होता.परिणामी काही प्रवाशांनी काचा फोडून खिडक्या तोडून आपला जीव वाचविला असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार विदर्भ ट्रॅव्हल्सची खाजगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात होती ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी निघाली. १ जुलैच्या रात्री १ वाजून २२ मिनिटांनी भरधाव वेगात असलेली बस समृद्धी महामार्गावरील रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पलटी झाल्यानंतर काही मिनिटातच सदर बसने पेट घेतला. त्यानंतर डिझेल टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण बस जळून खाक झाली. बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार बस मधून २५ जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण ३२ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. त्यातील ६ ते ८ लोक जखमी झाले आहेत. सदर जखमींना बुलढाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अपघातग्रस्त बस वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. त्यावेळी बसमधील कोणालाही पुढे काळ उभा असल्याची यत्कीचीतही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपापल्या भावी जीवनाच्या स्वप्नात रंगून खुर्चीला टेकून निवांत होता.काही वेळातच काळाने झडप घातली आणि क्षणात आक्रोश, किंकाळ्या, आगीचा थरार आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. या दुर्घटनेबद्दल देशभरातून शोक व्यक्त केल्या जात आहे.
विकासाची समृद्धी नव्हे; मृत्यूचा समृद्ध महामार्ग
नागपूर ते औरंगाबाद समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून सदर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आणि दिवसागणिक त्याची तीव्रता अधिकच वाढत आहे. प्रादेशिक विकासाचे गाजर दाखवत मोठ्या थाटामाटात बांधलेला हा महामार्ग समृद्धीचा नव्हे ; तर मृत्यूचा समृद्ध महामार्ग ठरत आहे. मात्र याच महामार्गाच्या बळावर आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेले राज्यकर्ते हे वास्तव कधीच स्वीकारणार नाही एवढे मात्र खरे..!