
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:प्रजासत्ताक भारताचा एक मतदार आणि राजकारणातील घडामोडींची रुची असणारा रक नागरिक म्हणून….
यालाच राजकारण म्हणतात का?
आज सकाळचे राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आजच दुपारी थेट उपमुख्यमंत्री बनतात.
अजित दादा व्यक्ती एकच. अत्यंत कामसू. तडफदार, प्रशासनावर आणि राजकारणावर पकड असणारा नेता. पहाटे भाजप सोबत शपथ घेतात. नंतर सरकार पडते. या सरकारच्या विरोधी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री होतात. नंतर हे सरकार पडते. नंतर तीन पक्षांच्या वज्रमूठ सभेत भाषणे करतात याच वेळी ते आता विरोधी पक्षनेता असतात. आज पुन्हा पहाटेचा शपथविधी ज्यांचे सोबत केला त्यांचे सोबत पुन्हा त्याच पदाची शपथ घेतात. शपथ घेताना तिथे राज्यपाल शपथ देतात हे माहीत असणारे अत्यंत अनुभव असणारे हे नेते सुरुवातीस ते ही विसरतात इतकी ही औपचारिकता होती का? सविधनाची शपथ घेताना संविधानाच्या प्रथा परंपरा अशा पायदळी… कधी कधी वाटते अजितदादा हे सर्व मनापासून करत असतील का? हे सर्व घडण्याचे कारण केंद्रीय यंत्रणा असो वा आणखी काही. या तर मुद्दे च आहेत.
छगन भुजबळ. अनुभवी नेते. भाजप मधील नेत्यांच्या तक्रारी वरून नंतर अटक होवून दीर्घ तुरूंगवारी करतात. त्यांच्या जीवनातील कदाचित तो अत्यंत क्लेशकारक काळ असेल. पण न झुकता तुरुंगात जातात. आज तेच त्यांना तशा वेदना देणाऱ्या लोकांबरोबर जातात. त्यांना भ्रष्ट ठरवणारे आता त्यांचे स्वागत करतात.
देवेंद्र फडणवीस .ते जेव्हा प्रथम विरोधी पक्ष नेते झाले व त्यानंतर मुख्यमंत्रीही तेव्हा त्यांच्या अभ्यासू पणामुळे एक तरुण , हुशार राजकारणी महाराष्ट्राला मिळाला अशी आमच्या सारख्या लोकांनी विचार केला. खूप पोटेन्शियल असणारे असे नेते आहेत. पण ते पदावरून गेल्या नंतर वेगवेगळ्या घडामोडीत सामील झाले. उध्वव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांना धडा शिकवू किंवा अद्दल घडवूच असा विडा त्यांनी उचलला. त्यातून एक चांगली व्यक्ती राजकारण राजकारण म्हणत कोणत्या पातळीवर जावू शकते हे पाहताना ज्या सुरुवातीला त्यांच्या बाबत अपेक्षा होत्या त्या धुळीला मिळाल्या. यात कोण बरोबर कोण चूक हे जो तो ठरवेल मात्र राजकारण म्हणजे असेच असते हा विचित्र विचार तरुण पिढी मद्ये अलीकडे निर्माण होत आहे. चांगले प्रशासन द्यायचे सोडून वेगळ्याच भानगडीत सर्व गुंतलेले असतात हेच यातून प्रतीत होते.
उद्धव ठाकरे. थेट मुख्यमंत्री. आदित्य थेट कॅबिनेट मंत्री. हे ही चूकच होते. तसे शिंदेनी केले ते देखील चूकच. एकमेकांनी एकमेकांना धडा शिकवला. पण मतदारांचे काय?
खूप विस्तारित बोलता येईल पण सगळीकडे तसेच तेच तेच आहे. काय बोलावे आणि कसे व्यक्त व्हावे?
शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोन उपमुख्य मंत्री हे समीकरण ही राजकारणाची लक्तरे वेशीवर टांगतात.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काहीसे असेच घडताना दिसत आहे. तरुण वर्ग आणखी तुच्छतेने याकडे पाहू लागला आहे. जे महाराष्ट्र आणि देशाच्या भवितव्यासाठी नक्कीच चांगले ठरणार नाही.
ही कसली आलीय गुगली आणि यॉर्कर?
तुम्हीच खेळाडू , तुम्हीच पंच आणि तुम्हीच प्रेक्षक! कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.