
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा :- नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी, दैनिक रत्नागिरी टाईम्स चिपळूण कार्यालयाचे व्यवस्थापक नंदकुमार चिटणीस यांची सुकन्या तेजस चिटणीस हिने MHT-CET प्रवेश परीक्षेत PCB ग्रुपतर्फे 98.74 टक्के प्राप्त केले असून या परीक्षेत तिने डीबीजे कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
अभियांत्रिकी, कृषी व औषध निर्माण शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या MHT-CET प्रवेश परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परीक्षेत डीबीजेची विद्यार्थिनी तेजस चिटणीस हिने अथक परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे उल्लेखनिय यश प्राप्त केले आहे. तेजस ही बालपणापासूनच हुशार मुलगी आहे. दहावी परीक्षेत तिने 92 टक्के, बारावी सायन्स शाखेतून 76 टक्के गुण पटकाविले होते. शिक्षकांबरोबरच आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश मिळविल्याची प्रतिक्रिया तेजस ने दिली. तिच्या या यशाबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी, संचालकांसह सदस्य, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.