
दैनिक चालू वार्ता
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
मतदार यादी अद्यावती करणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून मतदार यादी अद्यावतीकरणात निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज केले.
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, विविध पक्षाचे प्रतिनिधी यामध्ये कैलास पाटील, राजेंद्र जंजाळ, सचिन बनसोडे, प्रशांत म्हस्के यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी माहिती देण्यात आली की, मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यात 2 हजार 845 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.दि.21 पासुन मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादी अद्यावतीकरण प्रक्रिया राबविणार आहेत. दि.1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण करणारे, 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांनी मतदार नोंदणी होणार आहे. जिल्हा प्रशासन व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी अद्यावत करण्यासाठी निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे सांगण्यात आले. मतदार नोंदणी स्वतः करण्यासाठी मोबाईलमध्ये Play Store मधून Voter Helpline हे App डाऊनलोड करुनही ही नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्यावतीकरणाकरीता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे घरोघरी भेट देऊन मतदार यादी अद्यावतीकरणाचे कामकाज करणार आहेत. यामध्ये दि. 01 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नवीन मतदार, तसेच ज्या नागरिकांचे वय 18 वर्ष आहे मात्र त्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे. नाव, वय, पत्ता, फोटो इ.मध्ये दुरुस्ती करणे अथवा स्थलांतरीत मतदारांची मयत व दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळणी करणे इ. कामकाज केले जाईल.
पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार एकत्रित प्रारुप मतदार यादी दि.17 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल व दि.17 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारले जाणार आहेत. दावे व हरकती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हे दि. 26 डिसेंबर पर्यंत निकाली काढतील आणि अंतिम मतदार यादी दि.5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
‘व्होटर हेल्पलाईन’ मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी
दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट या दरम्यान नवमतदार नोंदणीची विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. नविन मतदार, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी आणि वंचित घटकातील मतदारांच्या नोंदणी करण्यात येईल. तसेच गृहनिर्माण संस्थांना BLO (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) हे भेट देऊन मतदार नोंदणी करतील. याशिवाय नागरिक, मतदार हे भारत निवडणूक आयोगाच्या VOTER HELPLINE या मोबाईल ॲपच्या मदतीने घर बसल्यादेखील ही प्रक्रिया करु शकतात. मोबाईलमध्ये Play Store मधून Voter Helpline हे App डाऊनलोड करुनही ही नोंदणी करता येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दि.21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.