
दोन आरोपी परतवाडा पोलीसांच्या ताब्यात
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (परतवाडा) :परतवाडा येथील लालपूल निवासी चांदसिंग कनिसिंग बावरी वय वर्ष ५० व अशोक सावळाराम शिंदे वय वर्ष ४५ या दोघांकडून स्थानिक पोलीसांनी २७ गावठी बॉम्ब जप्त केले.पोलीस उपनिरीक्षक सतीश झाल्टे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,चांदसिंग कनिसिंग बावरी व अशोक सावळाराम शिंदे हे दोघे रान डुकराची शिकार करून अंजनगाव सुर्जी रस्त्याने येत असल्याचा सुगावा पोलीसांना मिळाला होता.त्यानुसार स्थानिक पोलीसांनी नाकाबंदी केली.काही वेळाने हे दोघे दुचाकीद्वारे त्या रस्त्यावरुन परतवाड्याकडे येताना दिसले.दुचाकीवर त्या दोघांच्या मधात शिकार केलेले जंगली डुकर होते.नाकाबंदी केलेल्या पोलीसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता रान डुकराची शिकार करण्यासाठी त्यांनी रानात गावठी बॉम्ब पेरून ठेवले होते,अशी माहिती पुढे आली.तसेच त्यांच्या दुचाकीवर (एम.एच २७,झेड ७५९४) लटकवलेल्या पिशवीतून २७ गावठी बॉम्बही सापडून आले.
पोलीसांनी लगेच बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण करून ते बॉम्ब निकामी केले.त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन परतवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.त्यांच्याविरुद्ध भादंवि २८६ सहकलम ३ (ए),५ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ९ व वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास परतवाडा पोलीस करत आहे.