
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड( देगलूर): गेल्या २० ते २५ दिवसांपासून वरून राजाने अवकृपा केल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. रविवार पासून नांदेड जिल्ह्यात काही तालुके वगळता पावसाला प्रारंभ झाला. रविवारी काही तासाच्या फरकानंतर सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. तालुक्यातील खानापूर शहापूर हाणेगाव करडखेल सर्कल मध्ये रात्री पावसाचा जोर वाढला होता. या पावसामुळे मान टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले असून,प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी ४ ते ७ सप्टेंबर २०२३ हे चार दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ४,५,६ सप्टेंबर २०२३ या तीन दिवसांच्या काळात देगलूर तालुक्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.त्या अंदाजानुसार देगलूर तालुक्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा सोमवरी कमी अधिक प्रमाणात देगलूर तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपात रात्रभर पाऊस झाला. यामुळे देगलूर शहरात व ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यांवरील खड्डयात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. या पावसामुळे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.