
जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजन..
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर): राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी- बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. वडील दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजी राजांचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती.
१८५८ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयापुढे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जय मल्हार क्रांती संघटना शेटफळ हवेली व ग्रामपंचायत यांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या बरोबरच इतरही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शेटफळ हवेली चे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.