प्रतिनिधी/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
31 डिसेंबरपूर्वी उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडवर.मागील चार दिवसांत नियमांचे उल्लंघन करणार्या पुणे शहरातील विविध भागांतील तब्बल 10 हॉटेल, पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक नामांकित हॉटेल, पबचा समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरात तपासणी मोहीम राबवीत रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार्या बड्या हॉटेल्स, पब्जवर कारवाई केली होती. यानंतर आता नामांकित हॉटेल्स, पब्जवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. विमाननगर येथील ‘लेमनग्रास’ रेस्टॉरंट, शिरूर येथील हॉटेल ‘काकाज’ कल्याणीनगर येथील हॉटेल ‘युनिकॉर्न’, बॉलर्स, ट्वीन स्टार, कोरेगाव पार्क येथील प्लंज लाऊंज, हॉटेल फूशन, मेट्रो लाऊंज, नारंग पार्क, आर्यन बार अॅण्ड ग्रील असे कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्स, पबची नावे आहेत.
परवाना देताना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार्या शहरातील नामांकित हॉटेल्स, पबवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवडाभरात पथकांच्या माध्यमातून पब्ज, हॉटेल्सची झाडाझडती घेऊन नियमभंग करणार्या 10 आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे लेटलतिफ ‘डांगडिंग’ सुरू ठेवणार्या हॉटेल, पबचालकांचे धाबे दणाणले आहे. हॉटेल्स, पब्ज, बार, परमिट रूम्स यांना रात्री दीडपर्यंत परवानगी दिली जाते; मात्र यानंतरही रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणार्यांची संख्या मोठी आहे.
मागील आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पथके नेमून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपअधीक्षक युवराज शिंदे, संजय पाटील, संतोष जगदाळे, निरीक्षक अशोक शितोळे, दीपक सुपे, राजाराम शेवाळे, अनिल पवार, प्रवीण शेलार, सुनील गायकवाड, संजय कोल्हे, अशोक कटकम यांच्या पथकाने केली आहे.
उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत 13 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागच्या आठ महिन्यांत दारूची अवैध निर्मिती, वाहतूक, तसेच विक्री करणार्या दोन हजार 296 जणांवर क्रिमिनल केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 312 वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण 13 कोटी 15 लाख 11 हजार 18 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नियम तोडणार्या आठजणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच 42 जणांना स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याचबरोबर दारू विक्रीची परवानगी नसलेल्या ठिकाणी दारूविक्री केल्याप्रकरणी 189 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे.
“नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत आस्थापना सुरू ठेवणार्यांवर यापुढेदेखील कारवाई सुरू ठेवण्यात येईल. आस्थापना चालकांनी परवाना देताना घालून दिलेले नियम मोडणार्या शहरातील 10 हॉटेल, पबवर कारवाई करण्यात आली. विशेषतः वीकेंडला सुट्टीच्या दिवसांसह इतर दिवशी कारवाईसाठी खास पथक तयार केले आहे.” -चरणसिंह रजपूत, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, पुणे