
दै. चालू वार्ता, पैठण प्रतिनिधी
तुषार नाटकर-
पैठण तहसील कार्यालयात विविध कामासाठी खेड्यापाड्यातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. परंतु कार्यालयात कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांसह वृद्ध महिलांना हेलपाटे मारावे लागत आहे.
तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांचा धाक दिसून येत नसल्याचे समोर आले. दिनांक 20 जून गुरुवारी सकाळी वृद्ध महिला ग्रामीण भागातून संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे घेऊन आल्या असता, सकाळी साडेदहा वाजले तरी संजय गांधी विभागास कुलूप लावलेले आढळले. वृद्ध महिलांना सकाळी नऊ वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर ताटकळत उपाशीपोटी बसून राहावे लागले. कर्मचाऱ्यावर वचप नसल्याने हव्या त्यावेळी कर्मचारी तहसील कार्यालयात येतात, मनमानी वेळेत आल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी देखील वारंवार तहसील कार्यालयाला चकरा माराव्या लागतात. हा सगळा प्रकार थांबावा व सर्व सामान्य नागरिकांची हेळसांड वाचवावी अशी मागणी नागरिक करत आहे.