
दै. चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी:भारत पा.सोनवणे
*वैजापूर-* ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये. सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि महिलांचे अर्ज त्यांच्या गावातच स्विकारले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्ज करण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत केला तरीही महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल. अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. योजनेसाठी पाच एकर शेतीची अट काढण्यात आली आहे आणि लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६५ वर्ष करण्यात आला आहे.
परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केल्यास, त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
अडीच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येईल. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ दिला जाईल.
महिलांनी अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सुपरवायझर आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ‘नारी शक्ती दूत’ ॲपद्वारे देखील नाव नोंदणी करता येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, गावस्तर, मंडळस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर योजनेसाठी नाव नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत अर्ज भरावेत. महिलांना बँक खाते उघडण्यासाठी आणि ते आधार संलग्न करण्यासाठीही सुविधा उपलब्ध आहेत.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांना कोणत्याही दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले. अर्ज नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोणी लुबाडणूक करीत असल्यास तत्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणावे, असे त्यांनी सांगितले.
*वैजापूर तालुक्यातील आमदार रमेश बोरणारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ४ ग्रामपंचायत लोणी बुद्रुक येथे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेचे ऑफलाइन मोफत फार्म भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली त्याबद्दल सर्व महिला व गावकरी यांनी मा सरपंच तथा वैजापुर बा. स.संचालक गणेशभाऊ इंगळे यांचे आभार मानले.*