
पुणे: भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी “मानवी-रोबोट सहकार्य आणि एआय-आधारित ऑटोमेशन” या विषयावर एक दिवसीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर, एफ के एस मशीननबाऊ, बर्लिन, जर्मनी या प्रतिष्ठित संस्थेसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थिनींना जागतिक स्तरावर उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन एफ के एस मशीननबाऊ चे विभाग प्रमुख आणि रोबोटिक्स अभियंता मा. श्री. अलेक्झांडर श्वांड्ट यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात त्यांनी मानवी-रोबोट सहकार्याचे औद्योगिक उत्पादन प्रक्रियांमध्ये होणारे परिणाम आणि जर्मनीतील रोबोटिक्समधील तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक प्रगतीबद्दल सखोल माहिती दिली.
परिषदेतील एक मुख्य आकर्षण म्हणजे भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि एफ के एस मशीननबाऊ यांच्या दरम्यानचा शैक्षणिक सामंजस्य करार. या कराराद्वारे भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींना जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
मा. डॉ. के. डी. जाधव सहकार्यवाह, भारती विद्यापीठ यांनी या सामंजस्य कराराचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थिनींना जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “भारती विद्यापीठ विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण देत नाही, तर जागतिक तंत्रज्ञानाच्या आघाडीवर ठेवण्यासाठी अशा संधी निर्माण करत आहे.” त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने अनेक यशस्वी पावले उचलली आहेत.
मा. सौ. स्वप्नाली कदम, अध्यक्षा, रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स, पुणे यांनी आपल्या संदेशात सांगितले की तंत्रज्ञानातील विद्यार्थिनींनी २१व्या शतकातील आव्हानांसाठी सज्ज होणे अत्यावश्यक आहे. मा. डॉ. ओल्गा श्वांड्ट, तंत्रज्ञानतज्ञ, बर्लिन, जर्मनी यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांची आवड निर्माण करण्याचे महत्त्व विशद केले.
मा. डॉ. डी. व्ही. जाधव, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी एआआय आणि रोबोटिक्स क्षेत्रातील शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मा. डॉ. पी. डी. पाटील, डीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी एआय-आधारित तंत्रज्ञानाचे संशोधन व विकास यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. परिषदेमध्ये डॉ. डी. एस. बिलगी यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, ज्यांनी अशा तांत्रिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील प्रगतीशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक तांत्रिक प्रगतीबद्दल माहिती मिळुन त्यांना डिजिटल युगात पुढे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास विद्यार्थिनींना मदत होईल.
परिषदेत इंडस्ट्री 4.0 च्या व्याप्ती आणि इंडस्ट्री 5.0 स्वीकारण्यासाठी एआयच्या तिसऱ्या लाटेचा सखोल विचार मांडला गेला. या चर्चेमध्ये तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीतील विकास, विशेषतः मानवी-रोबोट सहकार्य, आणि उद्योगातील नवीन पद्धती कशा लागू करता येतील, यावर चर्चा झाली.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. विजया पवार आणि प्रा. डॉ. केतकी माळगी यांनी समन्वयक म्हणून काम केले, तर कु. प्रणवी मून आणि कु. लक्षिता पंचभाई यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. कांचन थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.