
निवडणुकीदरम्यान, प्रचार करताना नेते मंडळी अनेक आश्वासनं देतात. असंच एक आश्वासन परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांनी दिलं होतं. आता निवडणुकीच्या निकालानंतर या आश्वासनासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्यांचा फोन सतत खणखणत असतो.
‘ मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देईन ” असं आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी दिलं होतं. मात्र या निवडणुकीत परळीतून ते पराभूत झाले. पण तरीही त्यांना अनेक तरूणांचे फोन येत आहेत. त्या तरूणांशी संवाद साधताना देशमुख यांनीही दिलखुलासपण, दिलदारपणे उत्तर दिल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी विधानसभा मतदारसंघाचे पराजित उमेदवार राजेसाहेब देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आगे. मला निवडून दिले तर मी मतदार संघातल्या मुलांचे लग्न लावून देतो असे वक्तव्य राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान केले होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला पण देशमुख यांचा पराभव झाला. मात्र आता एका तरूणाने देशमुख यांना फोन लावत आपली विवाहाची समस्या त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सर्वत्र व्हायरल झाली आहे. पण या ऑडिओ क्लिपची चालु वार्ता पुष्टी करत नाही..
काय झाला संवाद ?
‘साहेब माझ्या लग्नाचं बघा.. तुम्ही म्हणला होतात..’ अशी एका तरूणाची विनंती करतानाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्याच्याशी राजेसाहेब देशमुख यांनीही दिलदारपणे संवाद साधत त्याला उत्तर दिलं. आम्ही तुम्हाला मतदान केले आता आमच्या लग्नाचे बघा अशी विनंती एका तरूणाने केली. प्रचारादरम्यान राजेसाहेब देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्या तरूणाने त्यांना करून दिली.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख असा सामना होता. त्यावेळी प्रचारादरम्यान राजेसाहेब देशमुख यांनी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजंब आश्वासन दिलं होतं, त्यांच्या या विधानाने अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. मात्र 23 तारखेला लागलेल्या निकालात परळीतून धनंजय मुंडे जिंकले तर राजेसाहेब देशमुख हरले.
निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा लोकांना विसर पडलेला नसून एका लग्नाळू तरूणाने त्यांना फोन करत आठवण करून दिली. एका तरुणानं राजेसाहेब देशमुख यांना फोन करून माझ्या लग्नाचं काय झालं असा सवाल केला. आम्ही आशेनं तुम्हाला मतदान केलं, आता मी २७ वर्षांचा आहे, म्हातारा झालो की कोण मुलगी देणार असा सवाल करत लग्नाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. मात्र त्यावर राजेसाहेब देशमुख यांनीही दिलखुलासपणे उत्तर दिलं. अरे, आमदार झाल्यावर ( लग्नाचं आश्वासन) पूर्ण करणार होतो मी, आता काय (निवडणुकीत) पाडलं मला, आता कशाचं लग्न होतंय ? मिश्कील स्वरात त्यांनी त्या तरूणाला असं उत्तर दिलं. आलो असतो तर कामाला आलो असतो. तुमच्या आशा ठेवा. मी असेपर्यंत आत्महत्या करू नका. चिंता करू नका मी आहे, असा धीरही त्यांनी त्या तरूणाला दिला. या ऑडिोची सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण या ऑडिओ क्लिपची चालु वार्ता पुष्टी करत नाही.