
महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर; पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा कमी कालावधीचा महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी उद्या (५ डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.
यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कमी कालावधीचा असल्यामुळे कार्यक्रमाची रचना संक्षिप्त करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यात देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे.
आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीला अंतिम रूप दिलं जात आहे. ३०,००० पेक्षा जास्त नागरिकांसाठी मोठा मंडप उभारला जात असून, १०० बाय १०० फुटाचं मुख्य स्टेज तयार करण्यात येत आहे. स्टेज आणि मंडप भगवंमय करण्यात येत आहे, आणि हा कार्यक्रम अत्यंत भव्य होणार आहे.
मंत्रिमंडळाचा शपथविधी पुढील काही दिवसांत मुंबईतील राजभवनात पार पडणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी नव्या मंत्रिमंडळाचे अस्तित्व येणार आहे.
आज दुपारी सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. भाजप पक्ष निरीक्षक विधानभवनात पोहोचण्याच्या तयारीत आहेत. १० वाजता कोअर कमिटीची बैठक, ११ वाजता भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड होईल, आणि नंतर ३.३० वाजता महायुतीचे नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.