
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे गेल्या ११ दिवसांपासून स्पष्ट झालं नव्हतं. अखेर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भाजपच्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपचे निरीक्षक म्हणून आलेल्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. गटनेते पदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानलं. महाराष्ट्रातील जनतेला सांष्टांग दंडवत असं म्हणत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी २०१९ च्या घडामोडींचा उल्लेख करताना मनातली खदखदही बोलून दाखवली.
२०१९ मध्ये राज्यात महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आडमुठी भूमिका घेतली. यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. फडणवीस यांनी या प्रकाराला बेईमानी असं म्हटलंय. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्याकाळात झाली. मी त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही.
फडणवीस यांनी एका गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल असं सांगताना म्हटलं की, २०१९ मध्ये बेईमान सरकार येताच त्यांनी सुरुवातीच्या अडीच वर्षात खूप त्रास दिला गेला. आमदारांना, नेत्यांना त्रास दिला. पण या परिस्थितीतही अडीच वर्षात एकही आमदार मला सोडून गेला नाही याचा मला अभिमान आहे. सगळे आमदार संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळे २०२२ मध्ये आपलं सरकार आलं आणि आता पुन्हा महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं.