
भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतील हे निश्चित झालं आहे.
5 डिसेंबर रोजी मुंबईतील फोर्ट भागामधील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र फडणवीस यांच्या नावाची गटनेतेपदी घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नावाने जारी करण्यात आलेलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असं उल्लेख असलेलं पत्रक व्हायरल झालं. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची ही निमंत्रणपत्रिका समोर आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही निमंत्रणपत्रिका पाठवल्याचं पत्राच्या खालील नावावरुन स्पष्ट होत आहे.
काय आहे या निमंत्रणपत्रिकेमध्ये?
महाराष्ट्र शासनाच्या या पत्राच्या मथळ्याखाली पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार, दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपता उपस्थित रहावे, ही विनंती,” असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हे निमंत्रण पाठवलं आहे. तसेच या निमंत्रण पत्रिकेमध्ये पोशाख हा राष्ट्रीय अथवा समारंभीय हवा असं म्हटलं आहे.
तळाशी काही सूचना
सदर निमंत्रणपत्रिका केवळ एका व्यक्तीसाठी असल्याचं आणि सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे. तसेच मोबाईल वगळता इतर कोणतीही वस्तू शपथविधीसाठी आणता येणार नाही असंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ही निमंत्रणपत्रिका हस्तांतरित करता येणार नाही असा उल्लेख तळाशी आहे.
5 हजार पोलीस, आयकार्ड अन्…
शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींसहीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते. आझाद मैदान परिसरामध्ये मोठा मंडप उभारण्यात आला असून सुरक्षेसाठी दोन दिवसांपासून या ठिकाणी 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच आयकार्ड असल्याशिवाय आझाद मैदानातून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.