
302 दाखल करा देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा म्हणाले…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही हृदय पिळवटून टाकणारे फोटो काल (दि. ०3) समोर आले. यानंतर सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने आज सकाळीच मस्साजोग गाठत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची भेट घेतली.
यावेळी मनोज जरांगे यांना पाहताच धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडेंना काढून फेकायला पाहिजे. दीड-दोन महिन्यात काय झाले हे आम्हाला माहीत नाही. मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे. त्याला आमदारकीसकट मंत्रीपदावरून काढून टाका आणि 302 मध्ये घ्या. नाहीतर तुम्हाला उद्रेकाला सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला सांगतोय, मला पुन्हा पुन्हा डिवचू नका, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिलाय.
संतोष भैय्यांचा बदला होणार
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, तुमच्यासोबत हत्या करणारी टोळी असल्यावर तुम्हाला खूप भोगावे लागणार आहे. तुम्ही साधं सोपं समजू नका. हे इतक्या नीच पातळीचे लोक आहेत की, यांच्यात कोणातच काहीच बदल होणार नाही. ही टोळी संपवावी लागणार आहे. या राज्यातल्या मराठ्यांना मी सांगतो की, यांना तांब्याभर पाणी सुद्धा देऊ नका. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची झाली असती तर तुम्ही कसे वागले असतात? आपल्या लेकराला हालहाल करून मारले. बदला होणार… संतोष भैय्यांचा बदला होणार, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
त्यांना नियती माफ करणार नाही
तर धनंजय देशमुख म्हणाले की, सगळे पाठीमागे उभे आहे. त्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो. इथून पुढेही जाऊ. त्यांना हीच गोष्ट हवी असेल की हे लोक कमजोर कसे होतील. त्या अर्थाने कदाचित इतके गुन्हे केले असते. मी आता निर्णय घेणार आहे. तो निर्णय कितीही कठोर असू द्या, सर्वांना विचारात घेऊन मी निर्णय घेणार आहे. हे फोटो लोकांनी आधीच बघितलेले आहेत. गृहमंत्रालयाकडे देखील हे फोटो गेलेले असणार, असा आरोप त्यांनी केला. इतक्या खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे लोक चालले आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांना नियती माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले.