
दैनिक चालु वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड – विज्ञान आणि तंत्रज्ञानातून समाजाची प्रगती होत असताना माणूस माणसापासून तुटत चालला आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. माणसाच्या मनात संवेदनशीलता आणि सुसंवाद निर्माण करण्यासाठी साहित्यिक उपक्रमांची गरज असते, असे प्रतिपादन कवी श्रीनिवास मस्के यांनी केले. वैष्णवीनगरी मित्र मंडळ, नांदेड यांच्यावतीने वैष्णवीनगरी येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध कवी आणि वक्ते श्रीनिवास मस्के यांच्या काव्यगायन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.उद्धव चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक, निवेदक श्री. विजय बंडेवार यांची उपस्थिती होती. कॉलनीवासियांनी हा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
या कार्यक्रमात श्रीनिवास मस्के यांनी शैक्षणिक,सामाजिक आणि स्त्रीविषयक जाणीवा अभिव्यक्त करणाऱ्या कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी पुढे बोलताना श्रीनिवास मस्के पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी नाते जोडावे. पुस्तकेच आपल्या जीवनात प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करीत असतात. त्यानंतर त्यांनी आपल्या काव्यगायनातून समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे, हा संदेश दिला. याप्रसंगी श्री. विजय बंडेवार यांनी गीतगायन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. उद्धव चौधरी यांच्या भाषणाने झाला . याप्रसंगी बोलताना प्रा .चौधरी म्हणाले की, आजच्या काळात माणूस मोबाईलच्या दुनियेत हरवून गेला असून माणसाचे मन मोकळे करण्यासाठी संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांची गरज आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका डॉ. कमलाकर चव्हाण यांनी मांडली. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. दिलीप माने आणि श्री. समर्थ लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार सौ.सिंधूताई माने यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन नागरिकांनी परस्परांत सुसंवाद साधला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. नारायण गैणवाड, श्री. मारोतराव वंजे, प्रा. सत्यनारायण सोनटक्के, श्री. विश्वंभर धोपटे, श्री. व्यंकटराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीनगरीतील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.