दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील धारासुर येथे राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामाला गती मिळावी तसेच पुढील अडचणी दूर करण्यासाठी 20 मार्च 2025 रोजी जिल्हा स्मारकस्तरीय महा वारसा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तहसीलदार तथा अध्यक्ष, गुप्तेश्वर मंदिर स्मारकस्तरीय महा वारसा समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्तरीय महा वारसा समितीचे अध्यक्ष यांना सर्व सदस्यांसह मंदिर स्थळाची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या मंदिराचा संपूर्ण शिखर उतरवून घेतले गेले असून मुख्य पाया (फाउंडेशन) मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, मंदिराच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूस काही खासगी मालकीच्या घरांमुळे खोदकामास अडथळा निर्माण होत आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने मंदिर परिसरात 78 लाख रुपये निधी मंजूर करून जनसुविधा केंद्र उभारण्यास कार्यारंभ आदेश दिला आहे. ग्रामपंचायत धारासुरनेही यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे.
याशिवाय, मंदिराच्या चहुबाजूने भूसंपादनासाठी महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रे पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. भूसंपादन, जीर्णोद्धार, आणि जनसुविधा केंद्र उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी 20 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.