
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : गेले काही दिवस सोशल मीडियावर आपले फोटोंचं कार्टून करून पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. तरूणांपासून ते आजीआजोबांपर्यंत सर्वत्र या ट्रेंडची चलती पाहायला मिळत आहे. एका बाजूला आपल्या फोटोंचे क्यूट घिबली आर्ट तयार करण्याची लाट आलेली असतानाच दुसरीकडे मात्र प्रायव्हसी एक्सपर्ट्स या ट्रेंडसाठी पर्सनल फोटो अपलोड केले जात असलेले पाहून वेगळीच चिंता व्यक्त करत आहेत.ओपनएआयच्या घिबली एआय आर्ट जनरेटरबाबत अनेकांनी चिंता आणि प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सायबर सुरक्षा हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेच अनेक सामान्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे ओपन एआयवर आपले वैयक्तिक फोटो शेअर करणे सुरक्षित आहे का? एआयच्या डिजिटल सुरक्षेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
तज्ञांच्या मते असं म्हटलं जात आहे की एआय प्रशिक्षणासाठी हजारो पर्सनल फोटो मिळवण्यासाठी ही एक युक्ती असू शकते. त्याच वेळी, त्यांचा असा विश्वास आहे की एआयचे वापरकर्ते नकळतपणे ओपनएआयला नवनवीन चेहऱ्यांबद्दलचा डेटा या फोटोंच्या माध्यमातून पुरवत आहेत. यामुळे त्यांची सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते.
कधीही अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा फोटो अपलोड केले जातात तेव्हा ते ऍप किंवा सोशल मिडिया साइट आपल्याकडून फोटो वापरण्याची परवानगी मागून घेते. यामुळे कंपनीला लोकांनी स्वेच्छेने सादर केलेले फोटो मिळवता येतात. यामुळे वेब-स्क्रॅप केलेल्या डेटावर लावलेल्या कायदेशीर निर्बंधांना टाळता येते. जीडीपीआर नियमांनुसार, जेव्हा वापरकर्ते स्वतः फोटो अपलोड करतात तेव्हा ते परवानगी देखील देतात, ज्यामुळे ओपनएआय आपल्या फोटोंच्या डेटावर प्रक्रिया करू शकते. कारण तसं करण्यासाठी आपणच त्याला परवानगी दिलेली असते.
तज्ञांनी असा इशारा दिला आहे की एकदा यूजर्सनी त्यांचे फोटो सबमिट केले की, त्या फोटोंच्या वापरावरील त्यांचे नियंत्रण सुटते. तज्ञांनी याकरता अनेक मुद्द्यांकडे यूजर्सचे लक्ष वेधले आहे.
1. वापरकर्त्यांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकतात.
2. फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते.
3. फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. याद्वारे बनावट प्रोफाइल देखील तयार केले जाऊ शकतात.
या धोक्यांचा विचार करून, यूजर्सनी त्यांचे फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.