
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याची मागणी केली आहे. तसेच, खाजगी बाजार भाव आणि सरकारी हमीभाव यातील तफावत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्यात यावी तसेच शेती साहित्याला 100% अनुदान देण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
2024 च्या निवडणुकीत सरकारने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यावर सरकारने आपला पवित्रा बदलत, सध्याची परिस्थिती पाहता कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगितले. यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांनी राम बोरगावकर तहसीलदार उदगीर यांना या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बळवंत चिंचोलकर, उदगीर तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, सहसचिव व्यंकट थोरे, मनोहर हिंडे, नरसिंग बनशेळकीकर, तालुका कार्याध्यक्ष धम्मसागर सुमनबाई नरसिंग सोमवंशी, तालुका उपाध्यक्ष सावन सोभाबाई अशोकराव तोरणेकर, तालुका सचिव दीपक गायकवाड, सह सचिव भागवत संगीता रमेश चौधरी, तालुका संघटक अतिशकुमार लिमराज अष्टेकर, तालुका संघटक तुकाराम नामदेव कांबळे, बंटी भाऊ घोरपडे, श्याम वाघमारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीच लागतील. जर शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल. यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते आणि शेतकरी संघटना आंदोलनासाठी तयारीला लागल्या असून, राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. सरकारने जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा ब्रिगेडने दिला आहे.