
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा
_________________________________
लातूर (उदगीर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लातूर येथे 26 मार्च रोजी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी महिलांना संबोधित करताना सांगितले की, “समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे आणि हे बचत गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरू आहे.”
या कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा तालुक्यांतील सीआरपी, कृषी सखी, पशू सखी, बँक सखी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या बायर-सेलर मिटचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन सादर केले. प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुका व्यवस्थापक तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.
या कार्यशाळेला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळाली.