
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी – अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : तालुक्यातील श्री क्षेत्र हत्तीबेट पर्यटनस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली. हत्तीबेटाला महाराष्ट्रातील नामांकित पर्यटन स्थळांचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त हत्तीबेट गडावर आयोजित त्यांच्या साखरतुला कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार बनसोडे यांनी मागील पाच वर्षांत हत्तीबेटाच्या विकासासाठी सात कोटी रुपयांचा निधी दिला असून, रस्ते व इतर सुविधा विकसित करण्यात आल्याचे सांगितले. वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा वाढवण्यासाठी पुढील निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.