
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून आणि खून करण्याचा प्रयत्न, शिवीगाळ करणे, धमकावणे, बेकायदेशीर जमाव जमा करून शिरूर तालुक्यात दहशत माजवणाऱ्या सराईतांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे शहर , पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातून तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून दि. ०२/०४/२०२५ पासून दोन वर्षासाठी तडीपार केले.संकेत संतोष महामुनी ( रा. सरदवाडी, ता. शिरूर,जि. पुणे ) याच्या टोळीतील अभिषेक हनुमान मिसाळ ( वय २३ रा. सोनार आळी, शिरूर ), शुभम दत्तात्रय दळवी ( रा. प्रितमप्रकाशनगर शिरूर , ता. शिरूर, पुणे ), गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय ३०, रा. गोलेगाव, ता. शिरूर, जि. पुणे ) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये,रांजणगाव एम आय डी सी मध्ये तसेच आसपासच्या भागात दहशत माजवणे, गंभीर दुखापत करुन तोडफोड करणे अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हे गुंड नागरिकांना कायम दहशतीखाली ठेवून वारंवार त्रास देत होते. त्यामुळे स्थानिक लोक नेहमी दडपणाखाली वावरत होते. या सराईतांवर वचक बसावा या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पुणे अविनाश शिळीमकर,शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण , पोलीस हवालदार परशुराम सांगळे ,पोलीस अंमलदार सचिन भोई,महेश बनकर,रामदास बाबर,नाथसाहेब जगताप, नितेश थोरात,नीरज पिसाळ,विजय शिंदे,रवींद्र आव्हाड,अजय पाटील,निखिल रावडे यांनी या गुंडांवर दाखल गुन्ह्यांचे अभिलेख तपासले. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांना पाठवला होता. मिळालेल्या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक देशमुख यांनी या टोळीला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
पिस्तूलाचा धाक दाखवून तसेच समाजमाध्यमांचा वापर करून दहशत निर्माण करणार्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या कारवाईच्या मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असून कठोर कारवाई करणार आहे.
– संदेश केंजळे,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन.