
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
माळशिरस (शिंदेवाडी):- दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी इयत्ता आठवीचे विद्यार्थी परीक्षेस बसतात. महाराष्ट्र राज्याकरिता जवळजवळ ११ हजार ५०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेस बसता येते. यावर्षी माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील रयत शिक्षण संस्था संचलित हनुमान विद्यालयातील ४७ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यापैकी ५ विद्यार्थ्यांना केंद्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी १० विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना प्रत्येकी ३८ हजार ४०० रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेचे,हनुमान विद्यालय हे गुणवत्ता चांगली असलेले विद्यालय म्हणून माळशिरस तालुक्यात प्रसिद्ध आहे.इतिहासात प्रथमच विद्यालयाने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.
परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन करणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार शिंदेवाडी ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग टीम शिंदेवाडी यांचे वतीने करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख फिरोज मुलाणी(गणित ), परमेश्वर सूर्यवंशी (बुद्धिमत्ता ),शरद पाटोळे (विज्ञान ),विजय पोटरे (सा. शास्त्रे ),बाळासाहेब क्षीरसागर (सा. शास्त्रे ) यांचे मार्गदर्शन लाभले.
या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षिका सौ.मिताली देठे, प्राचार्य दादासाहेब आकाडे, शिंदेवाडी चे केंद्रप्रमुख भरते साहेब, माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी करडे साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे साहेब तसेच आर्ट ऑफ लिविंग टीम, शिंदेवाडी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुजबळ सर, शिक्षक मनोगत मुलाणी सर तसेच पालक मनोगत नंदकुमार शिंदे,सौ.सुषमा शिंदे यांनी व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन कलूबर्मे सर व सूत्रसंचालन बालाजी बोंबडे सर यांनी केले.