
दैनिक चालु वार्ता धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव/ भूम :- येथील नगर परिषदेत २०२१ ते २०२५ या प्रशासकाच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब मस्कर व चंद्रमनी गायकवाड यांनी ३ एप्रिल रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला.यानंतर पालिकेने त्यांना चौकशीचे लेखी आश्वासन दिले. प्रशासन अन् पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
भूम नगर परिषदेकडून २०२१ ते २०२५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संपूर्ण दोर्षीविरोधात गुन्हे नोंदवावेत अशी मागणी चंद्रमणी गायकवाड व आबासाहेब मस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे.याबाबत प्रशासनाकडून कोणतीच हालचाल दिसून न आल्याने गुरुवारी (3) सकाळी 11:45 वाजता चंद्रमणी गायकवाड व आबा मस्कर हे दोघे नगरपालिकेच्या पोर्चमध्ये आले. त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ झाल्याने तात्काळ प्रशासनाकडून अग्निशमन दलाचे वाहन तैनात असल्याने पाणी फवारण्यात आल्याने अनर्थ टळला.या दरम्यान आंदोलन सुरू असतानाच प्रचंड गर्दी जमली होती.याच गर्दीतील अज्ञाताने अग्निशमन दलाच्या वाहनावर दगड मारला. यात वाहनाची समोरची काच फुटली आहे.यानंतर सीओ डाके यांनी कार्यालयाबाहेर येत घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची पंधरा दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्ते चंद्रमणी गायकवाड व आबासाहेब मस्कर यांना दिले.त्यानंतर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे पालिका परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.