दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर प्रतिनिधी –
तालुक्यातील मौजे रायखोड येथील परवानगी दिलेल्या गट क्रमांक ४७ मध्ये ५०० ब्रासची रॉयल्टी भरून दुसऱ्या गट क्रमांक ४६ मध्ये १० हजार ५२ ब्रास परिणामापेक्षा जास्त गौणखणीज उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी “केटीएल” कंपनीस कर्तव्य दक्ष तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सुमारे ६० लक्ष ३१ हजार २०० रुपयाचा दंड ठोठावला असून सदर दंड विहित वेळेत न भरल्यास पुन्हा पाचपट दंड आकारण्याचे आदेश ही दिले आहेत…
उमरी – भोकर – कारेगाव या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून “कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड” चैतन्य नगर, नांदेड कंपनीस देण्यात आले होते. या कंपनीकडून सदरील रस्त्याचे काम करताना मुरमाचा भरणा करण्यासाठी रायखोड शिवारातील गट क्रमांक ४७ मध्ये तत्कालीन तहसीलदार यांच्याकडून ५०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात परवानगी दिलेल्या परिणामापेक्षा जास्त परवानगी क्षेत्राबाहेर गट क्रमांक ४६ मध्ये मुरूमाचे उत्खनन करून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडविले होते. रायखोड येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी चेरकेवाड यांनी माहितीच्या अधिकारात सदर प्रकरणी माहिती घेऊन या कंपनीने परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याची तहसीलदार भोकर यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारी नंतर मंडळ अधिकारी रायखोड, उप. अधीक्षक भूमी अभिलेख व सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उप. विभाग भोकर यांच्या प्राप्त अहवालानुसार
सदर प्रकरणी तहसीलदार भोकर यांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ व दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सुनावणी घेऊन चौकशी अहवाल अधिकच्या पुराव्या वरून, “केटीएल” कंपनी दोषी आढळल्याने तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी या कंपनीस ६० लाख ३१ हजार २०० रुपयाचा मोठा दंड ठोठावला असून सदरील दंड विहित वेळेत न भरल्यास दंडाची रक्कम पाचपट करण्याचाही आदेश तहसीलदार गुंडमवार यांनी यांनी केटीएल कंपनीस दिलेला आहे…..
दोन वर्षानंतर का होईना न्याय मिळाला!
महसूल विभागाकडे केटीएल कंपनीने ५०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी घेऊन सुमारे १० हजार ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला होता याप्रकरणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सदर कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मागील दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला होता अखेर मा. तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन, हाती आलेल्या सबळ पुराव्यावरून अखेर या कंपनी विरुद्ध आरोप सिद्ध करताना सुमारे 60 लाखाचा दंड ठोठावला आहे यात खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचा विजय आहे. माझ्या पाठपुराव्यातून शासनाला अतिरिक्त साठ लाख रुपये महसूल मिळतो यामध्ये मला मोठे समाधान लाभले आहे. या कंपनीस काळया यादीत टाकण्यात यावे यासाठी यापुढे पाठ पुरावा करणार आहे.
संभाजी चेरकेवाड
सामाजिक कार्यकर्ते,भोकर