
सीसीटिव्ही ठरणार मोठा पुरावा !
बीडच्या जिल्हा कारागृहात 31 मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि गित्ते गँगचा महादेव यांच्यात मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती.
गिते गँगचा महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये मारहाण झाले नसल्याचे म्हटले होते. पण आता प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.
वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि त्यांच्या कारागृहातील इतर साथीदारांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गिते ,राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाला असून तो तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बीड कारागृह प्रशासनाकडून मारहाण वाल्मिक कराड आणि गिते गँगमध्ये झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांना कारागृह प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवले होते. त्यामुळे महादेव गितेला मारहाण झाली नाही तर त्यांना कारागृहात का हलवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे बीड कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हालवण्याच्या कारवाईबाबात ही कारवाई वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. अक्षय आठवले गॅंगवरही कारवाई करत नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले.
कारागृह प्रशासनाचा नेमका दावा काय ?
कारागृह प्रशासनाकडून कारागृहात झालेल्या मारहाणीबाबत सांगण्यात आले होते की, आरोपी 31 मार्चला सकाळी फोन करण्यासाठी बराकीतून बाहेर आले होते. त्यावेळी राजेश वाघमोडे, सुधीर सोनवणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी इतर कैदी देखील तेथे जमले. कारागृह प्रशासनाने वेळीच या कैद्यांना बाजूला करत वाद मिटवला. मात्र यावेळी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा केला जाणारा दावा चुकीचा आणि खोटा आहे.