
प्रत्यक्षदर्शी मोने कुटुबांने सांगितला थरकाप उडवणारा घटनाक्रम !
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीमधील अतुल मोने यांचाही समावेश होता. मोने यांची कन्या ऋचा आणि पत्नी यांनी थरकाप उडवणारा घटनाक्रम सांगितला.
ऋचा म्हणाली की, फायरिंग सुरू झालं तेव्हा मी स्वतः कन्फ्युज होते. सर्वजण इकडे तिकडे पळताना दिसले. त्यानंतर खाली झुकत होते. मी पण तसंच केलं. मी पण खाली झुकली होती.
थोड्या वेळाने मी डोकावून पाहिलं. त्यावेळी फायरिंग सुरूच होते. मी फायरिंग करणाऱ्या दोघांना पाहिलं होतं. कदाचित आणखी लोक होते. पहिल्यांदा ते दुरून फायरिंग करत होते. नंतर लोकांना ते शूट करायला लागले.
तिनं सांगितलं की, त्यांनी विचारलं हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. तिथे संजय काकांनी हात वर केला. तेव्हा त्यांना डोक्यात गोळी मारली. मी त्यांच्या मागेच होते. ते सगळं मी बघितलं.
नंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेलो की काय झालं. त्यांनाही एका बाजूला शूट केलं. त्यानंतर माझे बाबा बोलले की गोळी नका मारू.आम्ही काही नाही करत. तिथे माझी आई होती मागे, मी होते. ते गोळ्या चालवत होते. मी पण बाबाच्या सोबत होती. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेली. पण, त्यांनी बाबाच्या पोटात गोळी मारली
त्यानंतर घाबरून मी खाली झुकले आणि माझ्या बाबाजवळ काकू जवळ गेली. आई तिथेच होती. हे सगळं बघून मला तिथे काहीच सुचत नव्हतं.
पुढे अतुल मोने यांच्या पत्नी म्हणाल्या, मी मिस्टरांना वाचवण्यासाठी त्यांना कव्हर करत होती. मी त्यांना माझ्यामागे केलेले लोक माझ्यापुढे होती. तरीसुद्धा त्यांनी बरोबर मिस्टरांना गोळी मारली.
दहशतवादी म्हणाले की, तुम्ही लोकांनी दहशतवाद माजवला आहे. आम्ही पळू शकत नव्हतो, आम्ही झोपून होतो. मिस्टरांना गोळी लागताना मी पाहिलं
जाताना आम्हााला मिलिटरी दिसत होती, पण वाचवण्यासाठी दोन तीन चाॅपर हवी होती. पर्यटनस्थळी सुरक्षा नव्हती, तिथं सुरक्षा हवी होती.पहिल्यांदा म्हणाले हिंदू मुस्लीम बाजूला व्हा म्हणाले, असं का विचारताय आम्ही काय केलं नाही म्हणताच गोळी घातली. घरातल्या कर्त्या माणसाला गोळ्या घातल्या