
एकनाथ शिंदेंना हे वारंवार का सांगावं लागतंय; राजकारणात नेमकं काय सुरु आहे ?
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत कमाल केली. लाडक्या बहिणींच्या साथीने महायुतीने तब्बल १३२ जागा जिंकल्या. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आपसुकच मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे गेलं.
मात्र तेव्हापासून महायुतीत कोल्ड वाॅर सुरु झालं. महायुतीत अजित पवारांचा ‘एकला चलो रे’ कार्यक्रम सुरु असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दुराव्याच्या बातम्या मात्र वारंवार येत असतात. मुख्यमंत्री मीच आहे, हे एकनाथ शिंदे वारंवार सांगताना दिसतात. या विधानाचा नेमका अर्थ काय? फडणवीस- शिंदेंमध्ये खरंच शितयुद्ध सुरु आहे का? हाच विषय आपण आज समजून घेऊयात…
शिंदे यांची नाराजी का वाढली?
विधानसभा निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांना किमान सहा महिने मुख्यमंत्री राहण्याची इच्छा होती, असं सांगितलं जातं. त्यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यावेळी अनेकदा भेटी घेतल्या मात्र यश आले नाही. अखेर फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर शिंदे त्यांच्या मुळ गावी दरे येथे गेले. आता गेल्या सहा महिन्यांत एकनाथ शिंदे यांचे दरे या मुळ गावी तब्बल तीन-चार वेळा जाणे-येणे झाले. पालकमंत्रीपदाच्या वादानंतरही, ते नुकतेच दरे येथे जाऊन आले. महायुतीत सगळं अलबेल असल्याचं सांगितलं जात असलं तरी शिंदे नाराज आहेत, या चर्चा कायम होत राहिल्या.
फडणवीस-शिंदेंमध्ये शितयुद्ध?
गेल्या टर्ममध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना ते कायम देवेंद्र फडणवीसांसोबत दिसायचे. मात्र जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून शिंदे त्यांच्यापासून दूर असल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. काही वेळा फडणवीस-पवार यांच्या कॅबिनेट बैठकांनाही शिंदेंनी गैरहजेरी लावल्याचे दिसले. शिंदे यांच्याऐवजी गृहराज्यमंत्री योगेश कदम बैठकांना उपस्थित राहिले. फडणवीस-शिंदे यांच्यात शितयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी व स्वतः शिंदे यांनी त्या चर्चा अनेकदा फेटाळल्या.
मीच मुख्ममंत्री आहे…
एकनाथ शिंदे मीच मुख्यमंत्री आहे, असं विधान वारंवार करतात. हे विधान शिंदेंच्या तोंडून वारंवार का येतं, हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत. त्यातलं पहिलं उत्तर आहे, ते त्यांच्या पक्षातील नेत्यांना समाधानी करतात. कारण मुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती हातून गेल्यानंत शिंदेंच्या पक्षातील काही नेते नाराज झाले होते. त्यातच पालकमंत्रीपदाच्या वादावरूनही शिंदे शिवसेना बॅकफूटवर ढकलली गेल्याचे दिसले. त्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी शिंदे हे विधान वारंवार करतात, असा अर्थ लावला जावू शकतो. त्यातून स्वतः नेतृत्व बळकट करण्याचा प्रयत्नही शिंदे करत असावेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
शिंदेसेना बॅकफुटवर गेलीय का ?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तेही एकनाथ शिंदे यांच्यापासून काहीसे दूर गेल्याचे अनेकदा दिसले आहे. एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा फडणवीसांना आवडत नसावी, असंही बोललं जातंय. एकनाथ शिंदेंवर दबाव ठेवण्यासाठीच फडणवीस अनेकदा उद्धव ठाकरे किंवा थेट राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधताना दिसले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिंदे गटाला पु्न्हा आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे. तर भाजपलाही आपलं नेतृत्व बळकट करायचं आहे. आपलं अस्तित्व महायुतीत कायम ठेवण्यासाठीच शिंदे वारंवार मीच मुख्ममंत्री आहे, हे विधान करत असावेत असंही म्हणता येऊ शकतं.