
चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर…
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा अधूनमुधून राज्यात सुरू असते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापही नाराज असल्याचे दिसून येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर कधीच भाष्य करीत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव यासाठी घेतले जाते. यावर बावनकुळे यांनी महायुती सरकार आणि स्वतःची भूमिका स्पष्ट केली.
सध्या महायुतीचे चांगले सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेतला आहे. तोपर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे मत बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, ‘एका काँग्रेसच्या नेत्याने माझ्याकडे कालच तुम्ही मुख्यमंत्री झाला पाहिजे,’ अशी भावना व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुढील पंधरा वर्षे महायुतीचे सरकार कायम राहिले पाहिजे, अशा आमच्या भावना आहेत. त्याकरिताच आम्ही एकदिलाने काम करीत आहोत. महाराष्ट्राला झपाट्याने पुढे नेत आहोत,’ असेही बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस गतिमान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा, अशी सर्वांची भावना आहे. महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत,’ असे यावर मी त्या नेत्याला उत्तर दिल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, युती करणार आहेत, यावर बावनकुळे म्हणाले, ‘तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. दोन भावांची युती होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही.
भाजपचे 31 जिल्हाध्यक्ष, 1280 मंडळ गठित होतील. राज्य सरकारचे 108 महामंडळ आहेत. 765 अशासकीय सदस्य आहेत, वेगवेगळ्या महामंडळावर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी आहेत. साधारणतः महायुतीमध्ये तीन ते पाच हजार कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात. यासाठी महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व बसून येत्या दोन महिन्यात सर्व शासकीय समित्या, महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने जाहीर करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.