
नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान पंतप्रधानांना सल्ला !
इस्लामाबाद : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल 2025) दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.
त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करारला स्थगिती देण्यासह अन्य पाच मोठे निर्णय घेतले आहेत. याशिवाय, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांकडून भारताला वारंवार प्रत्युत्तराची धमकी दिली जात आहे. अशातच पाकिस्तानचे पतंप्रधान शाहबाज शरीफ यांना त्यांचे मोठे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताशी पंगा न घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.
पाकिस्तानी वृत्तपत्र दी एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, नवाझ शरीफ यांनी, भारतासोबतचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी शाहबाज शरीफ यांना राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचाही सल्ला दिला आहे. भारतासोबत युद्ध नको होणे, पाकिस्तानच्या दृष्टीने हिताचे नाही, असे नवाझ शरीफ यांचे म्हणणे असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.
भारताने सिंधू जल करार (IWT) स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समिती (NSC) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती शाहबाज शरीफ यांनी रविवारी पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांना दिली. भारतात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार स्थगित करण्यात आला आहे. शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना त्यांच्या जती उमरा येथील निवासस्थानी बोलावून याबाबतची माहिती दिली. यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यादेखील उपस्थित होत्या, असे सांगण्यात येते.