
विराट कोहली व अनुष्का शर्मा या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. विराट हा क्रिकेट जगतातील मोठे नाव आहे तर अनुष्का बॉलीवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडताना आपल्याला दिसते.
या दोघांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘विरूष्का’ म्हणतात. या जोडप्याला वामिका आणि अकाय अशी दोन अपत्ये आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा बॉलीवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर आहे. हे गोड कपल आपल्या मुलांसमवेत भारत देश सोडून लंडन येथे स्थायिक होणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या.
विराट कोहली सध्या फक्त क्रिकेट सामने खेळण्यासाठी आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी भारतात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विराट आणि अनुष्काने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम करत भारतापासून हजारो किलोमीटरवर असलेल्या लंडनमध्ये शांततापूर्ण आयुष्य जगण्याला प्राधान्य दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर रणवीर अलाहाबादियाला बोलावलं होतं. ‘हेल्थ अँड वेलफेयर’ विषयी माहिती देणारं युट्यूब चॅनेल डॉ. नेने चालवतात. यादरम्यान दोघांच्याही विराटच्या क्रिकेट स्टाईलविषयी गप्पा रंगल्या होत्या. यावेळी अनुष्का आणि विराटने भारत सोडून लंडनला जाण्याचा निर्णय का घेतला? याविषयी डॉ. नेनेंनी माहिती दिली.
डॉ. नेनेंनी विराट-अनुष्काची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. याबद्दल सांगताना नेने म्हणाले, “ते दोघंही खूपच चांगले आहेत. मी त्यांना अनेकवेळा भेटलो आहे. ते दोघंही तेव्हा लंडनला कायमस्वरुपी शिफ्ट होण्याच्या विचारात होते कारण, ते दोघंही इतके प्रसिद्ध आहेत, त्यांनी भरपूर यश मिळवलं आहे त्यामुळे भारतात राहून त्यांना कुटुंबासह प्रत्येक क्षण आणि वैयक्तिक आयुष्य हवं तसं एन्जॉय करणं शक्य नाहीय. कारण त्यांनी काहीही केलं तरी ते लगेचच चर्चेत येतात.”
नेनेंनी हेदेखील म्हटलं की, “अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या मुलांना ग्लॅमरपासून दूर आणि सामान्य जीवन जगू द्यायचे आहे. अनुष्काला दोन्ही मुलांचं अतिशय सामान्यपणे संगोपन करून त्यांना वाढवायचं आहे. ते दोघंही खूपच चांगले आहेत. इथे जरा बाहेर गेलं तरी एखादा चाहता सेल्फी मागतो. अर्थात ही वाईट गोष्ट नाहीये पण, सतत असं होत असल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी त्यांनी लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, विराट-अनुष्का हे एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते. दोघांनी 2017 मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. त्यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. तर, 2024 मध्ये अकायचा जन्म झाला. या जोडप्याने दोन्ही मुलांचे चेहरे सोशल मीडियावर आजवर प्रसिद्ध केलेले नाहीत.